महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू खिरोदा-पालसह हिंगोण्यात उद्या करणार पाहणी
फैजपूर- हॉर्टीकल्चर कॉलेजच्या जागेची पाहणी आणि सीमांकन करण्यासाठी तसेच सोबत हिंगोणा येथील टिश्यू कल्चर पार्क (कंद वर्गीय संशोधन केंद्र) च्या जागेची पाहणी करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.के.पी.विश्वनाथा हे शनिवारी येत आहेत. महाराष्ट्र कृषी आणि शिक्षण व संशोधन परीषदेचे उपाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर अवघ्या 15 दिवसात संबंधीत विषयाचा पाठपुरावा करून नामदार हरीभाऊ जावळे यांनी या विषयाला गती देऊन अंतिम टप्यात काम आणले आहे. संबधीत विषयाचे अधिकारी यांना या विषयाची पूर्तता तत्काळ करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. त्यानुसारच तत्काळ या विषयावर कार्यवाही होऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.के.पी.विश्वनाथा, रीसर्च डायरेक्टर डॉ.शरद गडाख, शिक्षण डायरेक्टर, डॉ.अशोक पटोदे, रजिस्टार सोपान कासार, विद्यापीठ अभियंता मिलिंद डोके हे जागेची पाहणी आणी सीमांकन करण्यासाठी येत आहेत. त्यांच्यासोबत महसूल, वन आणि सिटी सर्वेचे अधिकारी उपस्थित राहतील. दरम्यान, आमदार जावळे यांची ही मोठी उपलब्धी मानली जात आहे. या विषयामुळे हिंगोणा, खिरोदा आणि संबंध यावल रावेर भागात आनंद निर्माण झाला आहे.