भाजपाकडे वॉशिंग पावडर नव्हे तर विकासाचे डॅशिंग रसायन


खासदार सुप्रिया सुळेंच्या वक्तव्यावर भुसावळात मुख्यमंत्र्यांचा टोला

भुसावळ : भाजपाकडे कुठलेही वॉशिंग पावडर नाही तर विकासाचे डॅशिंग रसायन असल्यानेच भाजपात इनिकमिंग सुरू आहे मात्र त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी आमची चिंता सोडून त्यांच्या पक्षाला लागलेल्या मेगा गळतीची चिंता करावी, असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे लगावला. महाजनादेश यात्रेनिमित्त जिल्ह्यात आलेले मुख्यमंत्री शुक्रवारी रात्री भुसावळात मुक्कामास होते. दुसर्‍या दिवशी शनिवारी सकाळी 10.30 वाजता राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल राधाकृष्णमध्ये त्यांनी प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी मुख्यमंत्री खासदार सुप्रिया सुळे यांना पडलेल्या प्रश्‍नाचा समाचार घेताना विरोधकांच्या पक्षातच भ्रष्टाचाराची घाण असल्याचा टोला लगावला.

पाच वर्षात विरोधकांना गवसला नाही सूर
मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या वर्षात विरोधकांना सूर गवसला नाही. सुरुवातीला त्यांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना शिव्या घालणे हा एकच अजेंडा ठेवला तर आता त्यांनी मात्र ईव्हीएम हा अजेंडा हाती घेतल्याचे ते म्हणाले. भाजपात इनकमिंग सुरू असलेतरी सुप्रियाताईंनी मात्र त्यांच्या पक्षातील मेगा गळतीची चिंता करू नये, आत्मचिंतन करावे, त्यांच्या नेत्यांना आता त्यांच्या पक्षावर विश्‍वास उरला नसल्याची टिका त्यांनी केली.

ईडीच्या प्रश्‍नावर सोयीस्कर बगल
निवडणुकीच्या तोंडावर राज्यात उदंड यात्रा सुरू असून विरोधकांभोवती ईडीच्या चौकशीचा फास आवळला जात आहे याबाबत काय सांगाल या प्रश्‍नावर मुख्यमंत्र्यांनी भाजपात यात्रा काढण्याची परंपरा असल्याचे सांगत यापूर्वी विरोधात असताना सरकारविरोधात आम्ही आसुड यात्रा काढल्या तर आता सत्तेत असल्याने संवाद यात्रा काढत असल्याचे ते म्हणाले. ईडी विषयी यापूर्वीच आपण भूमिका मांडल्याने त्यावर पुन्हा बोलणार नसल्याचे सांगून त्यांनी प्रश्‍नाला बगल दिली.

सामनाच्या अग्रलेखावर ‘नो’ कमेंटस्
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाने पंतप्रधान मोदी व नोटबंदी व जीएसटीवर आज टिका केली आहे याबाबत काय सांगाल ? असा प्रश्‍न विचारला असता मुख्यमंत्र्यांनी त्यावर स्मितहास्य करीत त्यांना आतापर्यंत 50 वेळा टिका केली असेल मात्र मी प्रतिक्रिया देत नाही, असे सांगून त्यांनी या विषयावर अधिक बोलणे टाळले.

यांची पत्रकार परीषदेला उपस्थिती
राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल राधाकृष्णमध्ये शुक्रवारी रात्री मुक्कामी असलेल्या मुख्यमंत्र्यांनी शनिवारी सकाळी 10.30 वाजता प्रसिद्धी माध्यमांशी संवाद साधला. याप्रसंगी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, आमदार हरीभाऊ जावळे, माजी मंत्री एकनाथराव खडसे, आमदार संजय सावकारे, नगराध्यक्ष रमण भोळे, डॉ.राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर आदींची उपस्थिती होती. प्रास्ताविक भाजपा संघटन सरचिटणीस प्रा.सुनील नेवे यांनी केले.


कॉपी करू नका.