आंतरराज्यीय घरफोडी टोळीचा पर्दाफाश ; शिरपूर शहर पोलिसांच्या जाळ्यात अडकले त्रिकूट

दोन घरफोडी गुन्ह्यांची उकल : चोरीतील 1.06 लाखांचा सोन्या-चांदीचा मुद्देमाल जप्त : मध्यप्रदेशातील आंतरराज्यीय टोळीवर कारवाई


Interstate house-breaking gang busted ; trio falls into Shirpur City Police’s net शिरपूर (27 जून 2026) : शिरपूर शहर पोलिसांनी उत्कृष्ट तपास कौशल्याच्या जोरावर आंतरराज्यीय घरफोडी करणार्‍या टोळीचा पर्दाफाश करत तीन आरोपींना अटक केली. या कारवाईत दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून चोरीस गेलेले सोन्या-चांदीचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. एकूण एक लाख सहा हजार 550 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या आरोपींना अटक
मीठाराम भावसिंग तडवी (35, रा.आंबाबुका, ता.सेंधवा, जि.बडवानी, मध्यप्रदेश), रतला मालसिंग मेहडे (31) व जगदीश प्रताप किराडे (32, आंबासुटा, मोहाला, ता.सेंधवा, जि.बडवानी, मध्यप्रदेश) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या अटकेनंतर दोन गुन्ह्यांची उकल झाली आहे.



तपासादरम्यान घरफोड
शिरपूर शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी विलास देविदास देशी (रा. नवे अंतुर्ली, ता.शिरपूर, जि. धुळे) यांनी 12 मे 2026 रोजी त्यांच्या राहत्या घरातून अज्ञात चोरट्यांनी 44 हजार 550 किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिने चोरी केल्याची तक्रार दाखल केली होती. तपास सुरू असताना शिरपूर शहर प्रभारी किशोरकुमार परदेशी यांना नंदुरबार जिल्ह्यातील सारंगखेडा पोलीस ठाण्यात दाखल घरफोडीच्या गुन्ह्यात आरोपींना पकडण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर या आरोपींनी शिरपूर हद्दीतही घरफोडी केल्याचे कळताच त्यांना गुन्ह्यात ट्रान्सपर करून घेण्यात आले. आरोपींना ताब्यात घेताच त्यांनी दोन गुन्ह्यांची कबुलीदेत चोरी केलेले सोन्या-चांदीचे दागिने सेंधवा येथील सराफ व्यावसायिकांना विकल्याची कबुली दिल्यानंतर पोलिसांनी मध्यप्रदेशात जाऊन तपास केला. यामध्ये किशोर मोतीलाल सोनी ज्वेलर्स व शांतीलालजी सोनी ज्वेलर्स यांच्याकडून चोरीतील दागिने व चांदीची बिस्किटे जप्त करण्यात आली.

एक लाखांचा मुद्देमाल जप्त
आरोपींच्या ताब्यातून 42 हजार रुपये किंमतीची 14 ग्रॅम सोन्याची लगड, दोन हजार 550 रुपये किंमतीची 55 ग्रॅम चांदीची लगड, 20 हजार रुपये किंमतीची 10 ग्रॅम सोन्याची लगड व 42 हजार रुपये किंमतीची 1,020 ग्रॅम वजनाची दोन चांदीची बिस्किटे जप्त करण्यात आला. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत एक लाख सहार हजार 550 रुपये आहे. शिरपूर शहर पोलिसांच्या या कारवाईमुळे दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहे.

यांनी आवळल्या मुसक्या
ही कारवाई धुळे अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपअधीक्षक विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर निरीक्षक किशोरकुमार परदेशी, उपनिरीक्षक हेमंत खैरनार, अंमलदार रवींद्र आखडमल, अतुल पाटील, गोविंद कोळी, विनोद आखडमल, आरीफ तडवी, मनोज महाजन, सचिन वाघ, योगेश दाभाडे, भटू साळुंके, सोमा ठाकरे, मनोज दाभाडे, प्रशांत पवार, होमगार्ड मिथून पवार आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !