भुसावळ शहर पोलिसांच्या सतर्कतेने राईनपाडा घटनेची पुनरावृत्ती टळली
मुले पळविण्याच्या संशयावरून तीन साधूंना जमावाकडून मारहाण
भुसावळ : शहरात मुले पळवण्याच्या संशयातून जमावाने तिघा साधूंना बेदम मारहाण केली मात्र सुदैवाने वेळीच शहर पोलिसांनी धाव घेतल्याने या साधूंचे प्राण वाचले अन्यथा भुसावळात राईनपडा घटनेची पुनरावृत्ती झाली असतील, असे बोलले जात आहे.
मुले पळवण्याच्या संशयातून मारहाण
जळगाव रोडवरील भोई वाड्याजवळ तीन साधू भिक्षा मागत असल्याचे पाहून जनतेत मुले पकडणारी टोळी आल्याची अफवा कानोकान पसरली व पाहता-पाहता जमावाने पब्लिक मार या साधूंना सुरू केला. आम्हाला पोलिसांच्या ताब्यात द्या, मारू नका, आम्ही मुले पळवणारी नाहीत, असे गयावया हे लोक करीत असलेतरी जनतेला मात्र दया आली नाही. मारहाण करीत तिघांना जुने सतारेतील सरदार वल्लभभाई पटेल पुतळ्यापर्यत आणले जात असताना शहर पोलिस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी पोहोचल्यानंतर तिघांची सुटका करण्यात आली तर यामुळे राईनपाड्याची पुर्नरावृत्ती टळली.
शहर पोलिसांनी वाचवले तिघांचे प्राण
शहर पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक वैभव पेठकर, हवालदार संजय पाटील, जुबेर शेख व जितेद्र सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत तिघांना जमावाच्या ताब्यातून घेत शहर पोलिसात आणले तर यावेळी पोलिसांनी सतर्कता म्हणून जमावाचे चित्रीकरण केले. पोलिसांनी जे.के.नाथ (31), मुकेश स्वामी नाथ (35) व भारत नाथ स्वामी नाथ (26 तिन्ही रा. मुलठान, हिराफर ता. कसरावन, जि, खरगोन) यांना ताब्यात घेवून त्यांची वैद्यकीय तपासणी केली. पोलिसांनी तिघाही साधूंच्या मूळ गावी संपर्क साधला असून स्थानिक पोलिसांकडून त्यांच्याबाबत माहिती काढली जात असल्याचे पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे म्हणाले.