पुण्यात विषारी दारूमुळे 22 जणांचा मृत्यू : पोलीस निरीक्षकांसह सात अधिकार्‍यांचे निलंबन


22 Dead in Pune Due to Toxic Liquor: Seven Officials, Including a Police Inspector, Suspended पुणे (30 मे 2026) : पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये घडलेल्या विषारी दारू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून मृतांची संख्या आता 15 वरून 22 झाली आहे. विषारी दारूत अधिक नफा कमावण्यासाठी मिथेनॉल मिश्रीत करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. हलगर्जीपणा करणार्‍या पोलीस निरीक्षकांसह सात जणांचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे.

नफ्यासाठी दारूत मिसळले मिथेनॉल
अधिक नफा मिळवण्यासाठी आरोपी योगेश वानखेडे याने दारूमध्ये मिथेनॉल हे घातक रसायन मिसळल्याचे पोलिसांच्या तपासात उघड झाले आहे. उरळी कांचन परिसरातील राधेश्याम प्रजापती याच्याकडून योगेश वानखेडे 35 लिटरचा एक कॅन सुमारे 1900 रुपयांना खरेदी करत होता. त्यानंतर ही दारू पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध अवैध अड्ड्यांवर सुमारे 2700 रुपये प्रति कॅन दराने विकली जात होती मात्र अधिक नफा कमावण्यासाठी त्याने ऑनलाईन मागवलेले मिथेनॉल दारूमध्ये मिसळून त्याचे प्रमाण वाढवले. याच घातक मिश्रणामुळे अनेक नागरिकांचा जीव गेला.

चार आरोपींची कोठडीत रवानगी
या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग केला असून पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाने संयुक्त कारवाई करत अवैध दारूच्या नेटवर्कचा शोध सुरू केला आहे. या प्रकरणात आतापर्यंत आठ जणांना अटक करण्यात आली असून त्यापैकी चार आरोपींना 8 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

सात अधिकार्‍यांचे निलंबन
या दुर्घटनेनंतर पोलीस प्रशासनानेही कठोर भूमिका घेतली आहे. पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दापोडी ठाणे निरीक्षक विजय वाघमारे यांना निलंबित केले आहे. तपास पथकाच्या प्रमुखांसह आणखी चार अधिकार्‍यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे तसेच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. दुसरीकडे पुणे शहरात हडपसर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मोगले, सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकलगर आणि पोलीस उपनिरीक्षक मुलानी यांनाही निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणात निष्काळजीपणा करणार्‍या कोणालाही सोडले जाणार नसल्याचा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !