पुण्यातील विषारी दारूचे भिवंडी कनेक्शन : तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर 5929 किलो मिथेनॉलचा साठा जप्त
मुंबई (30 मे 2026) : पुण्यासह पिंपरी-चिंचवड परिसरात विषारी गावठी दारू सेवनामुळे 22 निष्पाप नागरिकांचा मृत्यू ओढवला होता. पोलीस प्रशासनाला या गंभीर प्रकारानंतर जाग आल्यानंतर कारवाईसत्र सुरू असतानाच अन्न व औषध प्रशासनाने या प्रकरणाचे भिवंडी कनेक्शन शोधले आहे. एफडीएचे धडाकेबाज आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर भिवंडीत मिथेनॉलचा मोठा साठा जप्त करण्यात आला.
5,929 किलो रसायन जप्त
पुण्यात विषारी दारू बनवण्यासाठी भिवंडीतून रसायन आल्याचे तपासात समोर आल्यानंतर एफडीएच्या विशेष पथकानं भिवंडी परिसरातील मे.रेक्स इंटरनॅशनल कंपनीच्या गोदामावर अचानक धडक छापा टाकला.
या कारवाईत मानवी जिवासाठी अत्यंत घातक असलेल्या ’मिथेनॉल’ या विषारी रसायनाचा सुमारे 5,929 किलोग्रॅमचा प्रचंड मोठा बेकायदेशीर साठा जप्त करण्यात आला. पुण्यात विकल्या गेलेल्या दारूच्या भेसळीसाठी मुख्य रसायन याच कंपनीकडून पुरवण्यात आलं होते.अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, या अत्यंत विषारी आणि घातक द्रव्याची कोणतीही अधिकृत खरेदी-विक्रीची नोंद किंवा साठा कंपनीच्या नोंदवहीत नाही.
