भुसावळ रेल्वे स्थानकावर प्रवाशांना दिलासा : शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी सुधारणा
Relief for Passengers at Bhusawal Railway Station: Improvements for Pure Water Supply भुसावळ (13 एप्रिल 2026) : उन्हाच्या झळा तीव्र होत असतानारेल्वे प्रवाशांसाठी सर्वात मोठा दिलासा म्हणजे स्वच्छ आणि थंड पाण्याची उपलब्धता. भुसावळसारख्या गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर, जिथे दररोज हजारो प्रवासी गाड्यांची वर्दळ असते आणि मोठ्या प्रमाणावर रेल्वे कर्मचार्यांची वस्ती आहे, तिथे पाण्याची गरज ही केवळ सुविधा नसून जीवनावश्यक बाब ठरते. याच गरजेची जाणीव ठेवत रेल्वे प्रशासनाने शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी ही मोहीम हाती घेतली आहे.
पाण्याच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा
प्रवाशांना स्वच्छ, सुरक्षित आणि विश्वासार्ह पाणी मिळावे, हीच सर्वोच्च प्राथमिकता मानून प्रशासनाने पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या आहेत. विशेषतः क्लॅरिफ्लिक्युलेटर आणि गाळ साठवण टाक्यांची नियमित व सखोल साफसफाई करून पाण्याच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा करण्यात आली आहे.

पाणीपुरवठा अधिक बळकट
या कामातील सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे अत्यंत मोठ्या क्लोरिफ्लोक्युलेटरची स्वच्छता कोणत्याही सेवा इमारती किंवा कर्मचारी निवासस्थानांच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम न करता यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. ही प्रक्रिया केवळ तांत्रिकदृष्ट्या आव्हानात्मक नव्हती, तर त्यामागे असलेली नियोजनबद्धता आणि जबाबदारीची जाणीवही अधोरेखित करते. या उपक्रमामुळे संपूर्ण फिल्टर प्लांट आता अधिक स्वच्छ, कार्यक्षम आणि सक्षम बनला आहे. सध्या या प्लांटमध्ये किरकोळ दुरुस्त्या, रंगरंगोटी (कलर वॉश) आणि व्हाईट वॉश यांसारखी पूरक कामेही वेगाने सुरू आहेत. पुढील टप्प्यात जॅकवेलच्या मुख्य मध्यवर्ती भागावर लक्ष केंद्रित करून पाणीपुरवठा अधिक बळकट करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
निःशब्द सेवा : प्रवाशांना दिलासा
ही सर्व कामे विभागीय व्यवस्थापक पुनीत अग्रवाल यांच्या सूचनेवर विभागीय अभियंता डी.एम.राव यांच्या मार्गदर्शनाखाली काटेकोरपणे पार पाडली जात असून त्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण यंत्रणा अधिक सजग आणि कार्यक्षमपणे कार्यरत असल्याचे दिसून येते. भुसावळ स्थानकावर दररोज येणारा प्रत्येक प्रवासी, उकाड्याने व्याकूळ झाल्यावर जेव्हा थंड, स्वच्छ पाण्याचा घोट घेतो, तेव्हा त्या मागे असलेल्या या अथक परिश्रमांची जाणीव कदाचित त्याला होत नाही; मात्र प्रशासनाची ही निःशब्द सेवा त्याच्या प्रवासाला दिलासा देणारी ठरते.
ही तर आमची सर्वोच्च जबाबदारी
भुसावळ रेल्वे स्थानकावर प्रवासी व कर्मचारी यांची मोठी वर्दळ लक्षात घेता शुद्ध आणि सुरक्षित पाणीपुरवठा करणे ही आमची सर्वोच्च जबाबदारी आहे. क्लॅरिफ्लिक्युलेटर व फिल्टर प्लांटची स्वच्छता तसेच सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामांमुळे पाण्याची गुणवत्ता अधिक सुधारली आहे. विभागीय अभियंता डी. एम. राव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामे नियोजनबद्ध पद्धतीने सुरू असून, येणार्या काळात जॅकवेलसह संपूर्ण यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर आमचा भर राहणार असल्याचे जनसंपर्क अधिकारी बी.बी.तपस्वी म्हणाले.









