भोंदू अशोक खरातच्या निकटवर्तीयाचा अपघाती मृत्यू : नेत्यांना मात्र घातपाताचा संशय!


Accidental Death of Close Associate of Imposter Ashok Kharat : Leaders, However, Suspect Sabotage! छत्रपती संभाजीनगर (17 एप्रिल 2026) : नाशिकचा भोंदू अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष डॉक्टर जितेंद्र शेळके यांचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर राज्यात मात्र नव्या वादाला तोंड फुटले आहे. अनेक नेत्यांनी हा अपघात नसून, घातपात असल्याचा संशय व्यक्त करीत भोंदू अशोक खरातच्या सुरक्षेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यापूर्वी अनेकांनी अशोक खरातच्या एन्काउंटरची भीती व्यक्त केली असून आजच्या अपघाताच्या निमित्ताने ही भीती अधिक ठळक पद्धतीने अधोरेखित होत असल्याचे नेते म्हणालेत.

असा घडला अपघात
जितेंद्र शेळके शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास आपल्या कुटुंबासह छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीच्या दिशेने जात होते. रस्त्यात समृद्धी महामार्गावरील धोत्रे गावालगत त्यांच्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असणार्‍या एका कंटेनरला मागच्या बाजूने जोरदार धडक दिली. त्यात जितेंद्र शेळके व त्यांची पत्नी अनुराधा हे दोघे जागीच ठार झाले तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. ही धडक एवढी भीषण होती की, त्यांची कार थेट कंटेनरखाली घुसली. त्यामुळे तिचा अक्षरशः चुराडा झाला. जखमी मुलाला लगतच्या रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे.


बातमी अत्यंत धक्कादायक : सुषमा अंधारे
लसुषमा अंधारे म्हणाल्या, अशोक खरात प्रकरणातील एक महत्त्वाची कडी शिवनिका ट्रस्टचे संचालक जितेंद्र शेळके यांचा अपघाती मृत्यू झाल्याची बातमी ही अत्यंत धक्कादायक आहे. मला ही गोष्ट खरे तर अविश्वसनीय वाटते. कारण, गेल्या अनेक दिवसांपासून ज्या अनेक नेत्यांनी ही भीती किंवा शक्यता व्यक्त केली होती की, अशोक खरातचे एन्काउंटर होऊ शकते. त्याच्या जिवाला धोका उद्भवू शकतो. आजच्या घटनेमुळे ही शक्यता अधिक जास्त ठळक पद्धतीने अधोरेखित होत आहे.

हा अपघात असूच शकत नाही? अंजली दमानिया
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही जितेंद्र शेळके यांच्या अपघातावर शंका उपस्थित केली आहे. जितेंद्र शेळके हे शिवनिका संस्थानावर नंबर 2 पोज़िशन वर होते. कल्पना खरात आणि रुपाली चाकणकर ह्याच्यापेक्षा त्यांचे वजन जास्त होते. तीन दिवसापूर्वी त्यांची ईडी चौकशी झाली आणि आज ते गेले ? हा अपघात असूच शकत नाही, असे दमानिया यांनी म्हटले आहे.

भोंदू खरातच्या सुरक्षेची काळजी घ्या : रोहित पवार
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही हा अपघात अत्यंत धक्कादायक असल्याचा आरोप केला आहे. शिवनिका संस्थानचे उपाध्यक्ष आणि भोदू अशोक खरात याचे सहकारी जितेंद्र शेळके यांचं अपघाती झालेलं निधन अतिशय धक्कादायक आहे. अजूनही पुढं न आलेले भोंदूचे इतर काही कारनामे पुढं येऊ नयेत आणि यामध्ये कुणीतरी अडचणीत येऊ नये, म्हणून तर हा अपघात घडवून आणला नाही ना, अशी शंका येते. या अपघाताची सखोल चौकशी झाली पाहिजे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !