गांजा वादाचा रक्तरंजीत शेवट : भर रस्त्यावर तरुणाची हत्या
Bloody End to Cannabis Dispute: Youth Murdered in Broad Daylight नागपूर (16 एप्रिल 2026) :अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जादूमहल ते सिद्धेश्वर सभागृह मार्गावर गांजा वादातून तरुणाला 10 ते 12 तरुणांनी सिनेस्टाईल घेरत त्याची चाकूने हत्या केली. सागर गिरधर सलामे (22, सोरंखीवाडी, सेवादलनगर) असे मृताचे नाव आहे. मृताचा मित्र हर्षल उर्फ लेक्स शिंदे (25, राणी भोसलेनेगर, भांडे प्लॉट) हा या घटनेत जखमी झाला. दरम्यान, खून प्रकरणात पीयूष कैथवास, अरविंद उर्फ चोख्या, शौर्य उर्फ भुर्या, साहिल कावेटिया व आणखी 6 ते 7 साथीदारांचा समावेश आहे.
काय आहे प्रकरण
संशयीत सर्व सावित्रीबाई फुले नगरातील रहिवासी आहेत. काही दिवसांअगोदर सागरचा काही मुलांसोबत गांजावरून वाद झाला होता व त्याने एका तरुणाच्या डोक्यावर लाकडी दांड्याने प्रहार केला होता. बुधवार, 15 एप्रिल रात्री हर्षल व सागर घराजवळील रॅलीत गेले होते.

त्यानंतर सागरला एक फोन आला व दोघेही दुचाकीने सिद्धेश्वर सभागृहाजवळ पोहोचले. तेथे पोहोचल्यावर सागरने मी पोहोचलो असे समोरील व्यक्तीला सांगितले. त्यानंतर ते समोरील व्यक्तीच्या सांगण्यावरून जादूमहल चौकात पोहोचले.
थोड्या वेळातच आरोपी दोन मोपेडवर आले व दोघांभोवती घिरट्या मारू लागले. त्यांचे इतर सहकारीदेखील पोहोचले व त्यांनी सागर-हर्षलला घेराव घातला. त्या दिवशी तूच डोक्यावर प्रहार केले होते ना असे विचारत आरोपींनी सागरला शिवीगाळ सुरू केली.
सर्वांनी दोघांवरही लाकडी राफ्टर, दांडा व चाकूने हल्ला केला. पीयूष व त्याच्या सहकार्यांनी सागरवर चाकूने वार केले. जखमी अवस्थेत जीव वाचविण्यासाठी सागरने सिद्धेश्वर सभागृहाच्या दिशेने धाव घेतली. आरोपी त्याला त्या अवस्थेतदेखील मारत होते. काही अंतरावर जाऊन सागर निपचित पडला. त्यानंतर आरोपी पसार झाले.


