जळगावात सा.बां.विभागातील बड्या अधिकार्यांची होणार एसीबीकडून चौकशी ; लाचखोर अभियंत्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी
ACB to Interrogate Senior PWD Officials in Jalgaon; Bribe-Taking Engineer Remanded to Two-Day Police Custody जळगाव (10 मे 2026) : कंत्राटदाराचे 80 लाखांचे बिल मंजुरीसाठी तडजोडीअंती 15 लाखांची लाच मागणी करीत पहिल्या हप्त्यापोटी पाच लाखांची लाच स्वीकारणार्या जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील वर्ग दोनचा अभियंता योगेश अभिमन्यू अहिरे यास जळगाव एसीबीने शनिवारी सायंकाळी अटक केली होती. लाचखोर अधिकार्याला न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, लाच प्रकरणात अन्य काही अधिकार्यांचा सहभागाचा संशय असल्याने दोन बड्या अधिकार्यांची सोमवारी चौकशी होणार असल्याचे एसीबीच्या सूत्रांनी सांगितले.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदार जळगाव जिल्ह्यातील कंत्राटदार असून त्यांनी वॉर्ड 14 मधील विठोबा नगरात सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम केले आहे व या कामासाठी 80 लाख 39 हजार 472 रुपयांचे टेंडर 2024 मध्ये मंजूर झाले होते मात्र निधी उपलब्ध नसल्याने केवळ 42 लाख रुपये ऑक्टोबर 2025 मध्ये प्राप्त झाले.


तक्रारदाराने उर्वरित 38 लाख 49 हजार 742 रुपयांचे बिल निघण्यासाठी अभियंता अहिरे यांच्याशी संवाद साधल्यानंतर त्यांनी बिल मंजुरीसाठी 18 लाखांची लाच मागितली व तक्रारदाराने एसीबीकडे तक्रार नोंदवल्यानंतर 5 मे रोजी पडताळणी करण्यात आली.
एसीबीने शनिवारी सापळा रचल्यानंतर आरोपी अहिरे याने त्याचे बलेनो वाहन (एम.एच.19 सी.व्ही.2619) च्या समोरील सीटखाली पाच लाखांची लाच रक्कम ठेवण्यास सांगितली व आरोपीने रक्कम स्वीकारताच दबा धरून असलेल्या पथकाने आरोपीला बेड्या ठोकल्या व गुन्ह्यातील कारही पथकाने जप्त केली.
आरोपीला दोन दिवसांची कोठडी
अटकतील अभियंता अहिरे यास जळगाव न्यायालयात हजर केल्यानंतर त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
दोन बड्या अधिकार्यांची उद्या चौकशी
लाच प्रकरणात बडा मासा एसीबीच्या गळाला लागल्यानंतर भ्रष्टाचारी अधिकारी हादरले आहेत. यापूर्वीही विभागातील विविध कामांमध्ये गैरव्यवहार आणि आर्थिक अनियमिततेचे आरोप होत आले असून आता अधिकारीच जाळ्यात अडकल्याने या प्रकरणाकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे. 15 लाखांच्या लाच प्रकरणात सा.बां.विभागातील दोन बडे अधिकारी एसीबीच्या रडारवर असून त्यांची सोमवारी चौकशी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. चौकशीअंती संबंधिताचा नेमका सहभाग किती? आरोपी अहिरेने तपासात कुणा-कुणाची नावे घेतली? या बाबींचा लवकरचा खुलासा होणार आहे. तपास जळगाव एसीबीचे पोलीस उअपधीक्षक योगेश ठाकूर यांच्या नेतृत्वात निरीक्षक रेशमा अवतारे व निरीक्षक हेमंत नागरे व सहकारी करीत आहेत.