मंत्री संजय शिरसाट यांचा गंभीर आरोप : नाशिकच्या धर्मांतर प्रकरणातील निदा खान ही तर इम्तियाज जलील यांची नातेवाईक


नवी दिल्ली (11 मे 2026) : राज्यात गाजत असलेल्या नाशिकमधील टीसीएस कंपनीतील धर्मांतर प्रकरणात मास्टर माईंड निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आल्यानंतर शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी या प्रकरणावर गंभीर आरोप केला आहे. निदा ही तर माजी खासदार इम्तियाज जलील यांची नातेवाईक असून तेदेखील या कटातील मुख्य सूत्रधार असल्याचा दावा त्यांनी केला.

 ‘पेड वर्कर’
संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना निदा खान ही केवळ सामान्य आरोपी नसून ती ‘पेड वर्कर’ असल्याचा आरोप केला. त्यांच्या मते, या प्रकरणामागे संघटीत पद्धतीने काम केले गेले असून आरोपींना राजकीय पातळीवरून मदत मिळाल्याचा संशय आहे. शिरसाट यांनी असा दावा केला की, एमआयएमच्या एका नगरसेवकाने निदा खानला लपण्यासाठी आसरा दिला होता. ज्या घरात ती राहत होती ते घरही अनधिकृत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्या जागेवर लवकरच कारवाई होऊ शकते, असे संकेतही त्यांनी दिले. या आरोपांमुळे प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे.



निदा खान आणि इम्तियाज जलील यांच्यातील नातेसंबंध
याचवेळी संजय शिरसाट यांनी निदा खान आणि इम्तियाज जलील यांच्यातील नातेसंबंधांबाबतही मोठा दावा केला. निदा खान ही इम्तियाज जलील यांच्या भावाच्या पत्नीची नातेवाईक असल्याचे त्यांनी सांगितले त्यामुळे या प्रकरणात जलील यांचा थेट संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एवढेच नव्हे तर, यासंदर्भात आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रही लिहिल्याची माहिती त्यांनी दिली. आता या गंभीर आरोपांवर इम्तियाज जलील काय भूमिका घेणार आणि त्यांचे उत्तर काय असेल, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

मतीन पटेल यांचे नगरसेवक पदही धोक्यात : महापौर
निदा खान हिला आश्रय दिल्याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने मतीन पटेल यांच्या नारेगाव परिसरातील त्यांचे दुसरे निवासस्थान आणि कार्यालयालाही नोटीस देण्यात आली आहे. महापौर समीर राजूरकर यांनी या प्रकरणावर भाष्य करत मतीन पटेल यांचे नगरसेवक पद रद्द करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याचे सांगितले.

दबाव आणल्याचे पुरावे
तपासात पीडित तरुणीचे नाव बदलण्याचा प्रयत्न, धार्मिक प्रभाव टाकण्यासाठी 171 लिंक पाठवणे आणि विशिष्ट धार्मिक पद्धती स्वीकारण्यासाठी दबाव आणल्याचे पुरावे मिळाल्याची माहिती समोर आली आहे. एसआयटी या सर्व बाबींची सखोल चौकशी करत असून आरोपींच्या संपर्कातील व्यक्ती, आर्थिक व्यवहार आणि सोशल मीडिया कनेक्शनची माहितीही तपासली जात आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यात मोठे राजकीय आणि सामाजिक पडसाद उमटताना दिसत आहेत. दरम्यान, नाशिक न्यायालयाने निदा खानला आज 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. निदा खान गरोदर असल्यामुळे तिच्या वाढीव पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली नाही व तिला न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचा मार्ग मोकळा झाला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !