मुक्ताईनगरात भरधाव डंपरच्या धडकेने दोन आदिवासी तरुण ठार
ग्रामस्थांच्या रास्ता रोको आंदोलनाने तासभर वाहतूक झाली ठपप
Two Tribal Youths Killed After Being Struck by Speeding Dumper in Muktainagar मुक्ताईनगर (14 मे 2026) : भरधाव डंपरने उडवल्याने दोन आदिवासी तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना मुक्ताईनगर शहराला लागून असलेल्या खामखेडा रस्त्यावरील स्मशान भूमीजवळ मंगळवारी रात्री 11.45 वाजेच्या सुमारास घडली. आदिवासी बांधवांच्या मृत्यूनंतर ग्रामस्थांचा संताप अनावर झाला व बुधवारी दुपारी शेतकरी तसेच ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करत जवळपास तासभर वाहतूक ठप्प केली. मुक्ताईनगरचे पोलीस निरीक्षक आशिष अडसूळ यांनी घटनास्थळी जाऊन ग्रामस्थांची व शेतकर्यांची समजूत काढल्यानंतर रस्ता मोकळा करण्यात आला. राजकुमार गोपाल बारेला (18, रोहणी बोरी बुजूर्ग, ता.बर्हाणपूर) व राहुल गणपत ठाकुर (19, श्री कॉलनी, मुक्ताईनगर) अशी मृतांची नावे आहेत.
रस्ता कामांमुळे वाहनांची वर्दळ
इंदोर-हैदराबाद 753 या रस्त्याचे काम सुरू असून रस्त्यावर डंपरची वर्दळ सतत सुरू आहे. त्यातच राजकुमार व राहुल हे दोन्ही तरुण दुचाकी (एम.पी.68 झेड.डी.8160) ने नफ्याने केलेल्या शेतीवर जात असताना स्मशानभूमी जवळ डंपर (क्रमांक एम.एच.1962त्र ने जोरदार धडक दिल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. बारेला हा घरातील सर्वात लहान असून त्याला मोठे दोन भाऊ एक बहीण व आई-वडील असा सहा जणांचा परिवार आहे.






पोलीस स्टेशनमध्ये समाज बांधवांचा आक्रोश
बुधवारी समाजबांधव सकाळपासून पोलीस स्टेशनमध्ये नोंद करण्यासाठी तगाता लावत असताना सुद्धा पोलिसांकडून कारवाई होत नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी देखील पोलीस स्टेशनला भेट देत पोलिसांवर संताप व्यक्त केल्यानंतर डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


