राज्यभरातील गुंतवणूकदारांना गंडा घालणार्या टीडब्ल्यूजे कंपनीने जळगावात 279 गुंतवणूकदारांची केली 24 कोटीत फसवणूक
ब्रँच मॅनेजर, एजंटांसह कंपनीच्या संचालकाविरोधात अखेर गुन्हा दाखल : तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे ः जळगावात मिलिंद पाटीलला अटक
गणेश वाघ
TWJ Company, which defrauded investors across the state, swindled 279 investors in Jalgaon out of ₹24 crore. भुसावळ (14 मे 2026) : गुंतवणूकदारांना जास्त परताव्याचे आमिष दाखवून जळगावातील 279 गुंतवणुकदारांची तब्बल 24 कोटी रुपयांमध्ये फसवणूक केल्याप्रकरणी टीडब्ल्यूजे असोसिएट्स प्रा. लि. कंपनीचे संचालक, ब्रँच मॅनेजर व एजंटांविरोधात जळगावात गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर गुंतवणूकदारांचे पैसे स्वीकारून रग्गड कमिशन स्वीकारणार्या मिलिंद पाटीलला अटक करण्यात आली. गुन्ह्याची व्याप्ती पाहता हा गुन्हा आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
असे आहे फसवणूक प्रकरण
भरत रतीलाल पवार (पाळधी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, टीडब्ल्यूजे असोसिएट्स प्रा. लि., पुणे या कंपनीच्या पदाधिकार्यांनी गुंतवणूकदारांना शेअर मार्केट ट्रेडिंगमधून मोठा नफा मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी विविध ठिकाणी सेमिनार घेऊन लोकांना आकर्षित करण्यात आले. गुंतवणूक केल्यास दरमहा अधिक परतावा मिळेल, अशी हमी देत अनेकांकडून रक्कम जमा करण्यात आल्याचा आरोप आहे.






24 कोटींचा घातला गंडा
तक्रारीनुसार डिसेंबर 2020 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत तब्बल 279 गुंतवणूकदारांकडून सुमारे 23 कोटी 81 लाख 72 हजार 530 रुपये जमा करण्यात आले मात्र मुदत पूर्ण झाल्यानंतरही गुंतवणूकदारांना परतावा न देता त्यांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 318(4), 316(2), 316(5), 61(2) तसेच ‘बेकायदेशीर ठेव योजना प्रतिबंध अधिनियम 2019’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या आदेशानुसार या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
यांच्याविरोधात दाखल झाला गुन्हा
टीडब्ल्यूजे असोसिएटचे प्रा.लि.चे संचालक समीर सुभाष नार्वेकर, नेहा समीर नार्वेकर, टीडब्ल्यूजे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट प्रा.लि.चे संचालक संकेश रामकृष्ण घाग, टीडब्ल्यूजे असोसिएट जळगाव शाखेचे मिलिंद शालिकराव पाटील (जळगाव) व इतर संचालक, एजंटांनी शेअर मार्केट ट्रेडींगची माहिती देवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.
राज्यभरात केली दाम्पत्याने फसवणूक
अवधूतवाडी (यवतमाळ), चिपळूण (रत्नागिरी), खारघर नवी मुंबई, वारजे माळेवाडी, पुणे शहर, श्रीनगर पोलीस ठाणे (ठाणे शहर), धंतोली (नागपूर शहर), माणगाव (रायगड), एमआयडीसी सिडको (छत्रपती संभाजी नगर) आदी ठिकाणी आरोपींनी फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत. आरोपी समीर नार्वेकर व पत्नी नेहा समीर नार्वेकर यांना 30 जानेवारी 2026 रोजी धंतोली, नागपूर शहर पोलिसांनी अटक केली असून त्यांचा ताबा लवकरच जळगाव आर्थिक गुन्हे शाखा घेणार आहे. जळगावातील गुन्ह्याचा तपास प्रभारी उपअधीक्षक संदीप पाटील, एपीआय गणेश फड, हवालदार रवींद्र परदेशी, विकास पहूरकर आदी करीत आहेत.


