भुसावळातील ताज नगरात पोलिसांची मोठी कारवाई : 22 किलो गांजासह दोघा भावांना बेड्या
जप्त गांजाचे अकोल्यास भोपाळ कनेक्शन : शहरातील गांजा तस्करी ऐरणीवर : बाजारपेठ व गुन्हे शाखेच्या संयुक्त कारवाईने खळबळ
गणेश वाघ
Major police action in Taj Nagar, Bhusawal: Two brothers arrested with 22 kg of ganja भुसावळ (15 मे 2026) : भुसावळच्या खडका रोड भागातील ताज नगरात दोघे भाऊ विक्रीसाठी गांजा बाळगून असल्याची माहिती जळगावच्या गुन्हे शाखेला मिळाल्यानंतर पथकाने छापेमारी करीत चार लाख 39 हजार रुपये किंमतीचा सुमारे 22 किलो गांजा जप्त केला. आरोपींनी भोपाळसह अकोला कनेक्शन समोर आले आहे तर भुसावळात येणार्या गांजा तस्करीचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. भुसावळातील भावंडांसह गांजा विक्री करणार्या चौकडीविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
चौकडीविरोधात गुन्हा
जळगाव गुन्हे शाखेचे हवालदार उमाकांत पाटील यांच्या फिर्यादीवरुन शेख अजीज अब्दुल मजीद पटेल (41, ताजनगर, भुसावळ), आरोपीचा मोठा भाऊ सलीम मजीद पटेल (45, ताजनगर, भुसावळ), अनस (भोपाळ), आदील खान (पूर्ण नाव नाही, अकोला) यांच्याविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहिती अन् आरोपींना पडल्या बेड्या
खडका रोडवरील ताज नगर भागात दोघे भाऊ गांजा विक्री करीत असल्याची गोपनीय माहिती परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक प्रशांत दरेकर यांना मिळाल्यानंतर त्यांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांना माहिती कळवली व कारवाईचे आदेश मिळताच पथक सक्रिय झाले. पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, भुसावळ उपविभागीय पोलीस अधिकारी केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने गुरुवार, 14 रोजी 12 वाजेच्या सुमारास खडका रोडवरील ताज नगरातील संशयीतांच्या घरात छापेमारी करीत 21 किलो 972 ग्रॅम वजनाचा व बाजारमूल्यानुसार चार लाख 39 हजार 440 रुपये किंमतीचा गांजा जप्त केला.
यांचादेखील कारवाईत सहभाग
बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ, गुन्हे शोध पथकातील हवालदार विजय नेरकर, कांतीलाल केदारे, चंद्रकांत रायपूरकर, योगेश माळी, भूषण चौधरी,सचिन चौधरी, जावेद शाह, प्रशांत सोनार, महेंद्र पाटील, अक्षय कोतकर आदींचाही कारवाईत सहभाग होता.



