भरधाव अॅपे रिक्षा उलटली : भुसावळ तालुक्यातील मोंढाळ्यातील चालक ठार
Speeding Ape Rickshaw Overturns : Driver from Mondhale in Bhusawal Taluka Killed भुसावळ (17 मे 2026) : भुसावळ तालुक्यातील मोंढाळा परिसरात भरधाव अॅपे रिक्षा पलटी झाल्याने चालकाचा मृत्यू झाला. हा अपघात शुक्रवारी सायंकाळी घडला. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली. धोंडू बुधो पाटील ( 60, रा. मोंढाळा, ता.भुसावळ) असे मृत चालकाचे नाव आहे.
वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अपघात
पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, धोंडू पाटील हे शुक्रवार, 15 मे रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास किन्ही ते मोंढाळा रोडवरील पेट्रोलपंपाजवळ त्यांच्या ताब्यातील अॅपे रिक्षा (एम.एच.19 एई 8096) चालवत असताना त्यांनी वाहन भरधाव वेगाने चालवून रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्याने रिक्षा अचानक पलटी झाली. या अपघातात गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
याप्रकरणी धनराज धुडकू डोळसे (46, मोंढाळा, ता.भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भुसावळ तालुका पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कैलास बाविस्कर करीत आहेत.










