यावलमध्ये सत्ताधारी विरोधकात वाद भडकला : खोटे आरोप करणार्यांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार
नगराध्यक्ष छायाताई पाटील, नगरसेवक अतुल पाटील यांची पत्रपरिषदेत माहिती
Dispute Erupts Between Ruling and Opposition Factions in Yawal: Defamation Suit to be Filed Against Those Making False Allegations यावल (17 मे 2026) : यावल नगरपरिषदेच्या सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपावरून वाद भडकला आहे. नगरपरिषदेत आंदोलन करतांना व सोेशल नेटवर्कवर नगराध्यक्षा छायाताई पाटील आणि माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान स्वीकृत नगरसेवक अतुल पाटील यांचे व्यक्तिशः एकेरी भाषेत नाव घेऊन भाजपा गटनेता व त्यांच्या पुत्राने बदनामी केल्याने त्यांच्याविरोधात जिल्हा न्यायालयात अब्रू नुकसानीचा दाखल करणार असल्याची माहिती नगराध्यक्षा व त्यांचे पती अतुल पाटील यांनी दिली. या संदर्भात शनिवारी त्यांच्या निवासस्थानी त्यांनी पत्रकार परिषद घेतली.
काय आहेत आरोप ?
यावल नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष छायाताई पाटील व नगरसेवक अतुल पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली होती. यात त्यांनी सांगितले की, साठवण तलावातील पाण्याची पातळी कमी झाल्याने तसेच हतनूर धरणाच्या कालव्यात उशिराने आवर्तन सोडल्याने यावल नगरपरिषदेच्या पाणीपुरवठ्यावर काही प्रमाणात विपरीत परिणाम झाला होता. परंतु पाणीपुरवठा तत्काळ पूर्ववत सुरू झाला असला तरी राजकीय विरोध म्हणून नगरपरिषदेच्या भाजपाच्या गटनेत्या नंदा राजेंद्र महाजन व त्यांचा मुलगा ऋतिक राजेंद्र महाजन या दोघ आई आणि मुलाने नगराध्यक्ष व स्विकृत नगरसेवक अतुल पाटील यांची व्यक्तिशः नावे घेऊन ऑन रेकॉर्ड, ऑन कॅमेरा त्यांनी बिन बुडाचा खोटा आरोप केला.
प्रभाग क्र. 10 व 11 मधील नागरिकांना पाणी सोडू देत नाही, असा खोटा आरोप उभयंतांनी केला तर त्यांच्याकडे पुरावा असेल तर त्यांनी पुरावा द्यावा, नाही तर जाहीर माफी मागावी त्याच बरोबर नगराध्यक्षा छायाताई पाटील यांचा एकेरी भाषेत उल्लेख करून व्यक्तिगत त्यांच्याबद्दल एकेरी, उद्धट चुकीची भाषा व्हाट्सअॅपवर / सोशल मीडियावर ऑन कॅमेरा वापरली म्हणजेच त्यांच्यावर राजकीय संस्काराचा अभाव दिसून आल्याने त्यांच्यावर जिल्हा सत्र न्यायालयात अबू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट करण्यात आले.
विरोध करतांना खोटे व व्यक्तीगत आरोप
विरोधी नगरसेवक द्वेष बुद्धीने खोटे आरोप करीत आहे व्यक्तीगत आरोप करणे चुकीचे आहे. नगरपालिकेच्या कामकाजात व्यक्तिशः नगराध्यक्ष छाया पाटील व अतुल पाटील या दोन सदस्यांना टार्गेट केले जात आहे त्यांचा निषेध म्हणून पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करीत निषेध व्यक्त करीत आहोत, असे या प्रसंगी उपस्थित नगरसेवक पराग सराफ, नगरसेविका वैशाली बारी, नगरसेवक निसार मोमीन, करीम कच्छी, काँग्रेसचे शहराध्यक्ष हाजी हकीम शेख, शिवसेना उबाठाचे तालुका प्रमुख शरद कोळी,नगरसेवक सागर चौधरी, संतोष खर्च यांनी सांगीतले
हा तर संस्काराचा अभाव?
नगरपालिकेतील वाद आता विकोपाला पोहचले असून भाजपच्या गटनेत्या नंदा महाजन व त्यांच्या चिरंजीवाच्या विरोधात सत्ताधारी नेते अतुल पाटील यांनी न्यायालयात धाव घेत अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे सांगतांना नगरपालिका गटनेता महाजन यांचे सुपुत्र ऋतिक महाजन यांच्यावर राजकीय संस्काराचा अभाव असल्याचे सुद्धा अतुल पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.










