भीषण बस अपघातात चालकासह दोघे ठार

20 प्रवासी जखमी : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात


Two, including the driver, killed in horrific bus accident पुणे (17 मे 2026) : प्रवाशांनी गच्च भरलेली भिवंडी डेपोची एसटी बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने थेट रस्त्याशेजारील खोल खड्ड्यात कोसळली. या दुर्दैवी अपघातात बस चालकासह एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर 20 प्रवासी गंभीर जखमी झाले. काही जण थोडक्यात बचावले आहेत. हा भीषण अपघात कल्याण-अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी घडला

असा घडला अपघात
अपघातग्रस्त बस ही भिवंडी डेपोची होती. रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने अनेक नागरिक प्रवासासाठी बाहेर पडले ज्यामुळे बसमध्ये प्रवाशांची मोठी गर्दी होती. महामार्गावरून प्रवास करत असताना गुंजाळवाडी फाटा परिसरात अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि अवघ्या काही क्षणांत संपूर्ण बस शेजारील खोल खड्ड्यात जाऊन कोसळली. अपघात इतका भीषण होता की बसच्या दर्शनी भागाचा पार चक्काचूर झाला.

खिडक्या तोडून प्रवाशांना काढले बाहेर
अपघाताचा मोठा आवाज होताच परिसरातील स्थानिक ग्रामस्थ, तरुण आणि इतर प्रवाशांनी तातडीने घटनास्थळाकडे धाव घेतली. प्रशासनाची वाट न पाहता उपस्थितांनी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू केले. बसचा दरवाजा लॉक झाल्याने तरुणांनी बसच्या खिडक्या आणि दरवाजे तोडून आत अडकलेल्या जखमी प्रवाशांना बाहेर काढले.

आळेफाट्यातील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू
अपघातानंतर आळेफाटा पोलीस आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांनी जखमींना तातडीने आळेफाटा येथील विविध खाजगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे, जिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक पूर्ववत केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !