भुसावळकरांना दूषित पाणीपुरवठा : भाजपा पदाधिकार्‍यांकडून जलशुद्धीकरण केंद्रातील कर्मचारी फैलावर

नगराध्यक्षांसह भाजप नगरसेवकांची अचानक पाहणी : अस्वच्छता पाहून पदाधिकारी संतप्त, तत्काळ स्वच्छतेचे निर्देश


Contaminated Water Supply to Bhusawal Residents: BJP Office-bearers Reprimand Water Treatment Plant Staff भुसावळ (18 मे 2026) : भुसावळ शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेच्या तक्रारी वाढत असतानाच प्रभारी नगराध्यक्षा शैलेजा नारखेडे व भाजप गटनेते युवराज लोणारी यांनी रविवारी नगरसेवकांसह जलशुद्धीकरण केंद्राला अचानक भेट देत परिस्थितीची पाहणी केली. या पाहणीत जलशुद्धीकरण केंद्रातील अत्यंत धक्कादायक व निष्काळजीपणाचे चित्र समोर आले. जलशुद्धीकरण केंद्रातील पाणी वाहून नेणार्‍या सिमेंट काँक्रीटच्या चार्‍यांमध्ये गवत उगवलेले दिसून आले तसेच केंद्राच्या अंतर्गत भागात कबूतरांसारख्या पक्ष्यांच्या विष्टेमुळे परिसर दूषित झालेला आढळला. या प्रकारामुळे शुद्धीकरण प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नगराध्यक्षांसह सर्व नगरसेवकांनी तीव्र संताप व्यक्त केला.प्रभारी नगराध्यक्ष शैलेजा नारखेडे यांनी संबंधित अधिकार्‍यांना तत्काळ स्वच्छता मोहीम राबवून परिसर स्वच्छ करण्याचे आदेश दिले. तसेच पाणीपुरवठा यंत्रणेतील त्रृटी दूर करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

यांची होती उपस्थिती
यावेळी नगरसेवक राजेंद्र आवटे, किरण कोलते, बबलू बर्‍हाटे, संतोष (दाढी) चौधरी, आशिष पटेल, प्राची पाटील, निकी बत्रा, विशाल नाटकर, आसीफ खान (मक्का), अजय नागराणी, अ‍ॅड.बोधराज चौधरी, रूपेश देशमुख, उदय पाटील आदी उपस्थित होते.

गाळमिश्रीत व दूषित पाणीपुरवठा
या पाहणीमुळे पाणीपुरवठा व्यवस्थेतील इतर गंभीर बाबीही समोर आल्या. सध्या बंधार्‍यात केवळ आठ दिवस पुरेल इतकाच जलसाठा शिल्लक आहे. तळातील पाणी उचलावे लागत असल्याने शहरात गाळमिश्रित व दूषित पाणीपुरवठा होत आहे. जलशुद्धीकरण केंद्रातही पुरेशा प्रमाणात शुद्धीकरण होत नसल्याचे चित्र आहे.

पाणीपुरवठा यंत्रणेत कर्मचार्‍यांची मोठी कमतरता भासत असून 1991 मध्ये असलेले 35 कर्मचारी आता केवळ 10 वर आले आहेत. वाढत्या लोकसंख्येच्या तुलनेत ही संख्या अपुरी ठरत आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून कंत्राटी कामगारांनी पगार थकबाकीमुळे असहकार सुरू केल्याने परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे.

बंधार्‍यातील गाळसफाई व गळतीकडे दीर्घकाळ दुर्लक्ष झाल्याने पाणी साठवण क्षमतेवर परिणाम झाला आहे. वाढत्या तापमानामुळे मोठ्या प्रमाणात बाष्पीभवन होत असल्याने जलसाठा झपाट्याने कमी होत आहे.

समस्येवर निघणार तोडगा
भाजपा गटनेता युवराज लोणारी यांनी सांगितले की, शहराच्या पाणीपुरवठा समस्येवर लवकरच तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू असून अतिरिक्त स्टोरेज वॉटर टँक उभारण्याचा प्रस्ताव पुढे नेण्यात येईल. यामुळे भविष्यात पाणीपुरवठा अधिक नियमित होण्यास मदत होईल.हतनूर धरणातून सोडण्यात आलेले लवकरच बंधार्‍यात पोहोचणार असून त्यानंतर नागरिकांना दूषित पाण्याचा त्रास सहन करावा लागणार नाही.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !