कबरीतून मृतदेह काढताच विवाहितेच्या मृत्यूचे गुढ उकलले
The mystery surrounding the married woman’s death was solved the moment her body was exhumed. नागपूर (20 मे 2026) : विवाहितेचा मृत्यू सासरच्यांनी ‘हार्ट अटॅक’ने आल्याचा दावा केला होता मात्र संशय आल्यानंतर मृतदेह कबरीतून बाहेर काढून पोस्टमार्टम केल्यानंतर गळा आवळून हत्या झाल्याचे उघड होताच सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. फाझिला जबीन शेख (19) असे खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे.
काय आहे प्रकरण ?
अमरावती येथील रहिवासी फाझिला जबीन शेख हिचा विवाह याच वर्षी जानेवारी महिन्यात नागपूरच्या बोरियापुरा परिसरातील जुबेर शेख याच्यासोबत झाला होता. सुरुवातीला सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र काही दिवसांनी हुंड्याच्या मागणीवरून तिला मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचा आरोप तिच्या माहेरच्यांनी केला आहे.



परिवाराच्या माहितीनुसार, 14 मे रोजी फाझिलाने आईला फोन करून रडत रडत मला वाचवा माझ्यासोबत काहीही होऊ शकतं असं सांगितले होते. यानंतर काही वेळातच तिचा फोन बंद झाला. त्यानंतर सासरच्या मंडळींकडून फाझिलाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची माहिती देण्यात आली. मृत महिलेचे आई-वडील नागपुरात पोहोचल्यानंतर सुरुवातीला त्यांना मृतदेह देण्यास नकार देण्यात आल्याचा आरोप आहे. नंतर मृतदेह अमरावती येथे नेण्यात आला. अंत्यसंस्कारापूर्वी मृतदेहाला स्नान घालत असताना फाझिलाच्या गळ्यावर जखमेचे निशाण दिसून आले त्यामुळे हत्या झाल्याचा संशय अधिक गडद झाला.
आरोपींना गुन्हा दाखल होताच बेड्या
मृत महिलेचा भाऊ मोहम्मद आवेश अब्दुल हसन यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. त्यानंतर मृतदेह कबरीतून बाहेर काढून पुन्हा शवविच्छेदन करण्यात आले. प्राथमिक शवविच्छेदन अहवालात गळा दाबल्याने मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. त्याआधारवर नागपूरच्या तहसील पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम 103, 238, 351(2) आणि 3(5) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात पती जुबेर शेख, दीर मोहम्मद इरफान आणि सासरे जलील शेख यांना आरोपी करण्यात आले आहे. पोलिसांनी पती आणि दीराला ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असून वृद्धापकाळामुळे सासर्यांना अटक करण्यात आलेली नाही.






