जळगावात एसीबीची मोठी कारवाई : सहकारी उपनिबंधकासह मानद कार्यकारी अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

अनुकूल अहवाल देण्यासाठी स्वीकारली दिड लाखांची लाच : सहकार क्षेत्रात प्रचंड खळबळ


Major ACB Operation in Jalgaon : Honorary Executive Officer, Along with Deputy Registrar of Cooperatives, Caught in ACB Net जळगाव (20 मे 2026) : अवैध सावकारी प्रकरणातील चौकशी अहवाल अनुकूल पाठवण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागून अखेर तीन लाख रुपयांत तडजोड करीत लाचेचा पहिला हप्ता दिड लाख रुपये स्वीकारताना जळगाव उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयातील उपनिबंधक जगदीश बाबुराव बारी (वर्ग-1) (शांती नगर, यावल रोड, भॐसावळ) आणि त्यांचा खासगी साथीदार व जिल्हा बँकेचा मानद कार्यकारी अधिकारी देविदास धनसिंग पाटील (भुरे मामलदार प्लॉट, शिवाजीनगर, जळगाव) यांना जळगाव एसीबीने सापळा रचून अटक केली आहे. या कारवाईमुळे सहकार विभागात मोठी खळबळ उडाली आहे.

असे आहे लाच प्रकरण
एसीबीनुसार, तक्रारदाराविरुद्ध अवैध सावकारी संदर्भात कारवाई सुरू होती. या प्रकरणाची सुनावणी उपनिबंधक सहकारी संस्था, जळगाव कार्यालयात सुरू होती. तक्रारदार आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध गुन्हा दाखल होऊ नये तसेच अवैध सावकारी चौकशी अहवाल अनुकूल पाठवण्यासाठी जळगाव उपनिबंधक जगदीश बारी यांनी सुरुवातीला पाच लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. नंतर ही रक्कम तीन लाख रुपयांवर ठरवण्यात आली.




तक्रारदाराने याबाबत 18 मे रोजी एसीबी, जळगाव विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर एसीबीने पडताळणी केली असता आरोपींकडून लाचेची मागणी होत असल्याचे स्पष्ट झाले. आरोपींनी तीन लाख रुपयांपैकी पहिला हप्ता म्हणून दीड लाख रुपये देण्यास सांगितले होते.

यानुसार एसीबीने बुधवार, 20 मे रोजी सापळा रचला. आरोपी देविदास धनसिंग पाटील यांनी जळगाव जिल्हा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स असोसिएशन लिमिटेड, बी.जे. मार्केट, जळगाव येथे तक्रारदाराकडून दीड लाख रुपयांची रक्कम स्वीकारताच त्यास पकडण्यात आले.या प्रकरणी जिल्हापेठ पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत कलम 7 व 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक
रेश्मा अवतारे, पोलीस निरीक्षक हेमंत नागरे यांच्यासह हवालदार बाळू मराठे, महिला हवालदार संगीता पवार, कॉन्स्टेबल मनोज पाटील, कॉन्स्टेबल सचिन चाटे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.

तक्रारदारांना एसीबीचे आवाहन
1नागरिकांनी कोणत्याही शासकीय अधिकार्‍याकडून लाचेची मागणी होत असल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन जळगाव एसीबीने केले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !