धुळे तालुका पोलिसांची मोठी कामगिरी : मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघड, चार दुचाकींसह आरोपी जाळ्यात
एक लाख 15 हजारांच्या दुचाकी जप्त ; गुप्त माहितीच्या आधारे कारवाई
Major Breakthrough by Dhule Taluka Police: Motorcycle Theft Case Solved; Accused Apprehended Along with Four Two-Wheelers धुळे (22 मे2026) : धुळे तालुका पोलिसांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत अवघ्या काही तासांत आरोपीला अटक करून चोरीस गेलेल्या चार मोटारसायकली हस्तगत केल्या आहेत. या कारवाईत सुमारे एक लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीच्या घटनांवर आळा बसण्यास मदत झाली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 23 मार्च 2026 रोजी फिर्यादी प्रल्हाद गोरख फुलपगारे (रा. भगवती कॉलनी, देवपूर, धुळे) यांनी त्यांची हिरो एचएफ डिलक्स (एमएच-18/बीबी-0750) ही मोटारसायकल मोराणे शिवारातील हॉटेल कारीयावाडी समोरून अज्ञात चोरट्याने लांबवली व या प्रकरणी धुळे तालुका पोलिस ठाण्यात दाखल नोंद करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित धनराज उर्फ धन्या राजू जांगिळ (21, रा. जुना टोल नाका जवळ, संबोधी नगर, सुरत बायपास, धुळे) याला ताब्यात घेऊन चौकशी केली. चौकशीदरम्यान त्याने मोटारसायकल चोरीची कबुली दिली.



चार दुचाकी चोरीची कबुली
आरोपीकडून पोलिसांनी विविध ठिकाणांहून चोरी केलेल्या चार मोटारसायकली जप्त केल्या. त्यामध्ये एक हिरो एचएफ डिलक्स, एक हिरो सीडी डिलक्स, एक होंडा सीडी डिलक्स आणि एक होंडा शाईन या दुचाकींचा समावेश आहे. जप्त वाहनांची एकूण किंमत सुमारे 1 लाख 15 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. या यशस्वी कारवाईमुळे धुळे तालुका पोलिस ठाण्यात दाखल असलेला मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून आणखी काही गुन्ह्यांबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बंबळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस निरीक्षक धनंजय पाटील, पोलीस अंमलदार उमेश पवार, संदीप शिंदे, राजू पावरा, गजेन्द्र मुंडे, प्रतीक देसले व प्रकाश माळी आदींच्या पथकाने केली.
धुळे तालुका पोलिसांच्या या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असून वाहन चोरी करणार्यांविरोधात पोलिसांनी कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.







