बोदवडमधील तरुणाच्या खूनानंतर जमावाचा उद्रेक : सहाय्यक पोलीस निरीक्षक व दोन पोलिसांचे तडकाफडकी निलंबन


गणेश वाघ
Mob Outrage Following Murder of Youth in Bodwad: Assistant Police Inspector and Two Constables Suspended Immediately भुसावळ (22 मे 2026) : बोदवड शहरातील अन्सार शेखलाल पिंजारी (मन्सूरी) या तरुणाच्या खुनानंतर जमाव संतप्त झाला होता. चोरी प्रकरणात संशय व्यक्त केल्यानंतर आरोपी अरबाज शाहवर पोलिसांकडून कठोर कारवाई अपेक्षित असताना तसे न घडल्याने आरोपीची हिंमत वाढली व त्याने अन्सार पिंजारी यांचा बुधवार, 20 मे रोजी धारदार चाकूने खून केला होता. या घटनेनंतर संतप्त जमावाने आरोपीचे घर पेटवत जोपर्यंत पोलिसांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याची भूमिका घेतली होती. पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर बोदवड पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवडकर, एएसआय रवींद्र गुरचळ आणि हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तडकाफडकी निलंबीत केले आहे. या कारवाईने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

असे आहे नेमके प्रकरण
बोदवडच्या हिदायत नगरातील अन्सार शेखलाल पिंजारी (मन्सूरी) यांच्या घरात गत आठवड्यात चोरी झाली व त्यांनी या प्रकरणात तीन संशयीतांचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला. त्यात अरबाज शाह याचेदेखील नाव होते. पोलिसांनी त्याची चौकशी करून सोडून दिले व त्यानंतर आरोपीने थेट अन्सार यांना ठार मारण्याची धमकी देत बुधवार, 20 रोजी त्यांची हत्या केली.




बोदवड पोलिसांची चालढकल : तक्रारदाराचा झाला मृत्यू
या प्रकरणात हेड कॉन्स्टेबल नंदकिशोर धनके यांच्याकडे दोन्ही पक्षांतील वाढत्या वादाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक कारवाईची जबाबदारी देण्यात आली होती मात्र त्यांनी प्रकरणाची गंभीरता दुर्लक्षित करून आवश्यक चौकशी तसेच कायदेशीर कारवाई केली नाही त्यामुळे दोन्ही गटांतील तणाव अधिकच वाढत गेला.

बीट अंमलदारावरही ठपका
बोदवड शहराचे टाऊन बीट प्रभारी एएसआय रवींद्र गुरचळ यांनाही परिस्थिती हाताळण्यात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. 19 मे 2026 रोजी दोन्ही गटांमध्ये वाद झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले होते मात्र दोन्ही पक्षांना पोलीस ठाण्यात आणून कोणतीही कठोर कारवाई न करता सोडून देण्यात आल्याचे चौकशीत समोर आले. त्याचवेळी कठोर प्रतिबंधात्मक पावले उचलली असती तर पुढील गंभीर घटना टाळता आली असती पण तसे घडले नाही.

प्रभारी अधिकारी पावले उचलण्यात अपशी
बोदवडचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सुरवडकर यांच्यावरही गंभीर ठपका ठेवण्यात आला. त्यांना फोन व व्हॉट्सअ‍ॅपद्वारे वादाची संपूर्ण माहिती देण्यात आली व स्थानिक नगरसेवकांनीही परिस्थितीची संवेदनशीलता लक्षात आणून दिली मात्र त्यांनी स्वतः कोणतीही कारवाई केली नाही तसेच अधीनस्थ कर्मचार्‍यांना तातडीने पावले उचलण्याचे निर्देशही दिले नाहीत. याशिवाय वरिष्ठ अधिकारी व कंट्रोल रूमलाही वेळेत माहिती न दिल्याचे चौकशीत निष्पन्न झाले.

कर्मचार्‍यांची होणार विभागीय चौकशी
तीन्ही अधिकारी-कर्मचार्‍यांच्या निष्क्रियता आणि निष्काळजीपणामुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आणि अखेर तरुणाच्या हत्येसारखी गंभीर घटना घडल्याचा ठपका विभागीय अहवालात ठेवण्यात आला. भुसावळचे उपअधीक्षक केदार बारबोले यांनी या प्रकरणात चौकशी करीत पोलीस अधीक्षकांना अहवाल दिला.

जमाव पुन्हा पोलीस ठाण्यात
पोलीस प्रशासनाकडून तातडीने संबंधितांवर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर कुठलीही हालचाल न झाल्याने शुक्रवारी जमाव पुन्हा पोलीस ठाण्यात धडकला व संताप व्यक्त करण्यात आला. जिल्हा पोलीस अधीक्षकांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित तिघांना तत्काळ प्रभावाने निलंबित केले व त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.










मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !