ट्रॅप झाल्याचे कळताच तलाठ्याने पाच हजार रुपये फेकले : नाशिक एसीबीने पंटरासह तलाठ्याच्या आवळल्या मुसक्या
Realizing he had been trapped, the Talathi threw away the ₹5,000; Nashik ACB arrests the Talathi along with the middleman. नाशिक (23 मे 2026) : सातबारा उतार्यावर नाव लावण्यासाठी तडजोडीअंती पाच हजारांची लाच स्वीकारताना नाशिकच्या देवळा तालुक्यातील खामखेडा येथील तलाठी व खाजगी पंटराला नाशिक एसीबीने अटक केली आहे. विशेष म्हणजे आरोपीने लाच रक्कम स्वीकारून खिशाल ठेवली मात्र ट्रॅप झाल्याचे कळताच त्याने रक्कम फेकून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न केला.
पप्पू काशिनाथ सोनकांबळे (46, आहेरमळा, कळवण रोड, देवळा, मूळ रा.देवळाली कॅम्प, नाशिक) व त्याचा पंटर प्रशांत दावल सोनवणे (24, खामखेडा, ता.देवळा, जि.नाशिक) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.




असे आहे लाच प्रकरण
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या खामखेडा शिवारातील शेतगट क्रमांक 127 मधून बहिणीचे हक्कसोड पत्रान्वये नाव कमी करण्यासाठी खामखेडा तलाठ्याकडे अर्ज करण्यात आला होता. बहिणीच्या नावासह मूळ तक्रारदार यांचेदेखील नाव 7/12 उतार्यावरून कमी झाल्याने ते पुन्हा नोंदवून देण्यासाठी तलाठी सोनकांबळे यांच्याकडे अर्ज करण्यात आला होता. या कामासाठी तलाठ्याने पाच हजार रुपयांची लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली.
त्यानुसार सापळा रचून देवळा येथील वाजगाव रोडवरील टीव्हीएस मोटारसायकल शोरूमसमोर कारवाई करण्यात आली. यावेळी तलाठी सोनकांबळे यांनी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्यांना ताब्यात घेतले.
लाच रक्कम फेकली
कारवाईदरम्यान आरोपी तलाठ्याने लाच रक्कम खिशात ठेवली व त्यास शासकीय वाहनात बसवल्यानंतर त्याने लाचेची रक्कम वाहनातून फेकून पुरावा नष्ट करण्याचाही प्रयत्न करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकरणी देवळा पोलिसात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक नेहा सूर्यवंशी करीत आहेत. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक एकनाथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार योगेश साळवे, चेतन शेवाळे, परशुराम जाधव आदींच्या पथकाने केली.







