दहिगावातील तरुणाचा ट्रॅक्टर रोटरमध्ये सापडल्याने जागीच मृत्यू
Young Man from Dahigaon Dies on the Spot After Getting Caught in Tractor Rotor यावल (23 मे 2026) : शेती कामांसाठी शेतात ट्रॅक्टरद्वारे रोटर केले जात असताना तरुणाचा त्यात अडकून मृत्यू झाला. ही घटना मोहराळा, ता.यावल या गावाच्या शेतशिवारात शोभराज महाजन यांच्या शेतात शनिवारी दुपारी 12 वाजता घडली. योगेश यशवंत पाटील (28, दहिगाव, ता.यावल) असे मृताचे नाव आहे.
तोल जावून कोसळल्याने मृत्यू
योगेश हा तरुण त्याच्या मालकीचे ट्रॅक्टर घेऊन रोटर करण्यासाठी गेला असता शनिवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास रोटर करत असताना तो स्वतःच तोल जाऊन ट्रॅक्टरच्या खाली कोसळला आणि रोटर मध्ये सापडून जागीच ठार झाला. हा प्रकार शेजारील शेतातील शेतमजुरांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने मयताच्या कुटुंबास माहिती दिली.




नागरिकांनी शेतात धाव घेऊन तातडीने त्याला तेथून ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉ.गौरव भोईटे यांनी तपासणी करून मयत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिसात राजेंद्र पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे, हवालदार मोहन तायडे, राजेंद्र पवार करीत आहे.







