वनविभागाची मोठी कारवाई : चार महिलांची बळी घेणारी टी-2 वाघीण जेरबंद
ट्रॅन्क्युलायझर डार्ट मारून मिळवले नियंत्रण ; नागरिकांनी घेतला सुटकेचा श्वास
Major Operation by Forest Department: Tigress T-2, Responsible for Killing Four Women, Captured चंद्रपूर (24 मे 2026) : तब्बल चार महिलांचा बळी घेणार्या नरभक्षक टी-2 वाघिणीला अखेर वन विभागाने ट्रॅन्क्युलायझर डार्ड मारू जेरबंद केल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.
चंद्रपूरच्या सिंदेवाही वनपरिक्षेत्रात नरभक्षक वाघिणीच्या उपद्रवाने जनसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्यानंतर चार महिलांचा बळी
सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलात शुक्रवारी सकाळी काही महिला तेंदूपत्ता गोळा करण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी अचानक एका वाघिणीने त्यांच्यावर हल्ला चढवला. त्यात चार महिलांचा जागीच मृत्यू झाला होता. वाघाच्या हल्ल्यात एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात जीवितहाणी होण्याची ही पहिलीच घटना असल्याने राज्यात एकच खळबळ माजली होती. वनविभागाने केलेल्या तपासात हा हल्ला टी-2 नामक वाघिणीने केल्याचे निष्पन्न झाले होते. तेव्हापासून तिचा माग काढणे सुरू होते. अखेर शनिवारी रात्री वन विभागाच्या कर्मचार्यांना टी-2 वाघिणीला जेरबंद करण्यात यश मिळाले.



पवनपार बीटमध्ये झाली कारवाई
सूत्रांच्या माहितीनुसार, पवनपार बीट कक्ष क्रमांक 282 मध्ये ही कारवाई करण्यात आली. टी-2 वाघिणीला बेशुद्ध करून पकडण्याचे आदेश प्राप्त होताच वन विभागाच्या विशेष पथकाने जंगल परिसरात तिचा युद्धपातळीवर शोध सुरू केला. या पथकाने शनिवारी रात्री 7.15 च्या सुमारास ट्रॅन्क्युलायझर डार्टद्वारे एका वाघाचा वेध घेतला. सुरुवातीला अंधारामुळे डार्ट लागलेला वाघ हल्लेखोर वाघीण आहे किंवा नाही याविषयी संभ्रम होता. पण त्यानंतर सदर वाघ ही नरभक्षक टी-2 वाघीण असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आठ वाजेच्या सुमारास तिला जेरबंद करण्यात आले.







