जळगाव जिल्ह्यात पेट्रोल-डिझेलचा पुरेसा साठा ; नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : जिल्हाधिकारी रोहन घुगे यांचे आवाहन
Adequate Stock of Petrol and Diesel in Jalgaon District; Citizens Should Not Believe in Rumors: Appeal by District Collector Rohan Ghuge जळगाव (24 मे 2026) : जळगाव जिल्ह्यात पेट्रोल व डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच पॅनिक बायिंग टाळावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी केले. जिल्हाधिकार्यांनी रविवार, 24 रोजी सकाळी शहरातील पेट्रोल पंपावर भेट देऊन इंधन साठा व पुरवठा परिस्थितीची पाहणी केली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे उपस्थित होते.
विविध पंपांवर इंधनाचा घेतला आढावा
यावेळी महसूल प्रशासन, पोलीस प्रशासन, पुरवठा विभाग तसेच आयओसीएल, बीपीसीएल, एचपीसीएल, नायरा आणि रिलायन्स या कंपन्यांचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकार्यांनी सर्व संबंधित अधिकार्यांची बैठक घेऊन जिल्ह्यातील इंधन साठ्याचा आढावा घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.



1760 किलोलीटर इंधन लवकरच उपलब्ध होणार
जिल्हाधिकार्यांनी सांगितले की, रविवारी सकाळची जी स्टॉक पोझिशन आहे ती 1990 किलोलिटरची स्टॉक पोझिशन आपल्याकडे डिझेलच्या संदर्भामध्ये उपलब्ध आहे. पेट्रोलच्या साठ्यामध्ये काहीही कमतरता नाही आहे आणि पेट्रोल बाबत पॅनिक सुद्धा नाही आहे. पॅनिक हे आपल्या काही ठिकाणी डिझेलच्या बाबतच होते. तर 1990 केएल ची आपल्याकडे सप्लाय आहे, त्याच्या अगेन्स्ट आपल्या येथे 1550 केएल च्या आसपास मागणी आहे आणि ट्रान्झिटमध्ये जो येणारा साठा आहे, आपल्याकडे 1760 किलोलिटरचा जो साठा आहे तो ट्रान्झिटमध्ये असल्याचे त्यांनी नमूद केले.
गेल्या चार दिवसांच्या तुलनेत एका दिवसातच मोठ्या प्रमाणावर डिझेलची विक्री होत असल्याने काही ठिकाणी पुरवठ्यावर ताण जाणवत असल्याचे निरीक्षण प्रशासनाने नोंदविले आहे मात्र संपूर्ण जिल्ह्यातील साठा पर्याप्त असून येणारा पुरवठादेखील मुबलक असल्याने नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले.
साठेबाजी रोखण्यासाठी प्रशासन सतर्क
नागरिकांनी घाबरून जाऊ नये, पॅनिक होऊ नये, पॅनिक बायिंग करू नये, खुल्या कंटेनरमध्ये पेट्रोल-डिझेल घेऊन जाणे टाळावे. अत्यावश्यक परिस्थितीतच सुरक्षित कंटेनरचा वापर करून इंधन घ्यावे, असे आवाहन करत जिल्हाधिकार्यांनी साठेबाजी रोखण्यासाठी प्रशासन सतर्क असल्याचे स्पष्ट केले. सर्व पेट्रोल पंपांवर महसूल, पुरवठा व पोलीस विभागाकडून नियमित गस्त घालण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
लावणीच्या हंगामामुळे शेतकर्यांमध्ये निर्माण झालेल्या चिंतेबाबत बोलताना जिल्हाधिकार्यांनी सांगितले की, शेतकर्यांसाठी आवश्यक तेवढे पेट्रोल-डिझेल पर्याप्त प्रमाणात उपलब्ध आहे त्यामुळे इंधनाचा अतिरिक्त साठा करण्याची आवश्यकता नसून गरजेनुसार पुरवठा सुरळीत सुरू राहील, असे त्यांनी स्पष्ट केले.







