भुसावळात ट्रॅक्टर चालकाला लोखंडी वस्तूने मारहाण : दोघांविरुद्ध गुन्हा
भुसावळ (25 मे 2026) : शहरातील नाटकर चौक परिसरात ट्रॅक्टर चालकाला लोखंडी वस्तूने मारहाण करून जखमी करण्यात आल्या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी पसार झाले आहेत.
काय घडले शहरात ?
राहुल नारायण कानडे (38, रा. अष्टविनायक कॉलनी, भुसावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, 22 मे रोजी रात्री सुमारे 11 वाजेच्या सुमारास मामाजी टॉकीज परिसरातून पाण्याचा टँकर भारत नगरकडे घेऊन जात होते. नाटकर चौकात मागून मोटारसायकलवर आलेल्या आरोपी अजु मुस्ताक खाटीक व अबु सलीम खाटीक (दोघे रा.खाटीक वाडा, भुसावळ) यांनी ट्रॅक्टरच्या पुढील चाकाजवळ वाहन आणले.


यावेळी फिर्यादी यांनी गाडी नीट चालवा असे सांगितल्याचा राग आरोपींना आला. त्यानंतर दोघांनी शिवीगाळ करत हाताबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच अजु खाटीक याने मोटारसायकलजवळील लोखंडी वस्तू काढून फिर्यादीच्या तोंडावर व डोळ्याजवळ मारहाण केल्याने ते जखमी झाले.
घटनेनंतर आरोपी तेथून पसार झाले. या प्रकरणी भुसावळ शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस उपविभागीय अधिकारी केदार बारबोले यांनी घटनास्थळी भेट दिली. तपास नाईक रज्जाक खान करीत आहेत.






