जळगाव कारागृहात पोलीस कर्मचार्याला बंदीवानाकडून मारहाण
Police personnel assaulted by inmate in Jalgaon Jail जळगाव (9 जून 2026) : वेळ संपल्यानंतर बॅरेकमध्ये जा सांगितल्याच्या रागातून कर्तव्यावर असलेल्या पोलिसालाच बंदीवानाने मारहाण केली. ही धक्कादायक घटना जळगावातील कारागृहात 8 रोजी 11 वाजेच्या सुमारास घडली. या प्रकरणी संशयीत सुनील यशवंत नन्नवरे (पाळधी, ता.धरणगाव) विरोधात जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण ?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव जिल्हा कारागृह वर्ग-2 येथे कार्यरत असलेले पोलीस रक्षक काशीनाथ कारभारी मोटे (26) हे सोमवार, 8 जून रोजी सकाळी 11 ते 11.15 वाजेदरम्यान कर्तव्यावर असताना बंदी वेळ संपल्यानंतर त्यांनी कैदी सुनील यशवंत नन्नवरे (रा. पालधी, ता. धरणगाव, जि. जळगाव) यास नियमानुसार बॅरेकमध्ये जाण्यास सांगितले मात्र याचा राग आल्याने सुनील नन्नवरे याने रक्षक काशिनाथ मोटे यांच्याशी वाद घालत त्यांना शिविगाळ केली. त्यानंतर आरोपीने मोटे यांना चापटाबुक्क्यांनी मारहाण केली व झटापटीतील मोटे यांच्या गणवेशावरील खाकी शर्टाची दोन बटणे तुटली.
याप्रकरणी पोलीस रक्षक काशीनाथ मोटे यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलिसात आरोपी सुनील यशवंत नन्नवरे याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक संजय भांडारकर करीत आहे.


