कंडारीत कपिलेश्वर मंदिराच्या प्रवेशद्वाराचे पाडकाम : ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर रेल्वे प्रशासन नरमले

दहा दिवसात मोजमापाअंती पुन्हा प्रवेशद्वार उभारणीचे रेल्वे प्रशासनाचे आश्वासन


Demolition of Kapileshwar Temple Entrance in Kandari: Railway Administration Relents After Villagers’ Protest भुसावळ (17 जून 2026) : शहरालगतच्या कंडारी गावात रेल्वे प्रशासनाने सुमारे पाचशे वर्षे जुने असलेल्या पुरातन कपिलेश्वर महादेव मंदिराच्या बांधकामाधीन प्रवेशद्वाराचे पाडकाम सुरू केल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी आंदोलन केले. यावेळी रेल्वे प्रशासनाच्या आडमुठ्या भूमिकेचा निषेध करण्यात आला शिवाय पाडकामाचे कुठलेही आदेश नसल्याचे समोर आल्यानंतर ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी रेल्वे प्रशासनाने नरमाईची भूमिका घेत दहा दिवसात मोजमाप करून पुन्हा प्रवेशद्वार उभारणीचे आश्वासन दिले.

ना हरकत घेतल्याचा दावा
मिळालेल्या माहितीनुसार, कंडारी गावातील कपिलेश्वर महादेव मंदिर हे ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण असून येथे देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. मंदिर मुख्य रस्त्यापासून अंतर्गत तापी नदीकाठी असल्याने भाविकांना मंदिरापर्यंत पोहोचताना अडचणी येत होत्या. यावर उपाय म्हणून मंदिर ट्रस्टतर्फे मुख्य रस्त्यावर प्रवेशद्वार उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यासाठी रेल्वेसह संबंधित सर्व विभागांची ना हरकत परवानगी घेतल्याचा दावा ट्रस्टकडून करण्यात आला आहे.

रेल्वेच्या कारवाईने तीव्र संताप
मंगळवारी सायंकाळी सुमारे पाच वाजता रेल्वेचे अधिकारी व रेल्वे सुरक्षा दलाच्या बंदोबस्तात जेसीबीच्या सहाय्याने उभारण्यात आलेले आरसीसी खांब पाडण्यास सुरुवात करण्यात आली. ही माहिती समजताच ग्रामस्थ मोठ्या संख्येने घटनास्थळी जमले आणि त्यांनी कारवाईला तीव्र विरोध दर्शविला. ग्रामस्थ, मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी व पोलीस पाटील यांनी शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेनंतर रेल्वे प्रशासनाचे अधिकारी नरमल्याचे दिसून आले. संबंधित कारवाईबाबत कोणतीही लेखी सूचना नसून तोंडी आदेशावरूनच पाडकाम करण्यात आल्याची बाब समोर आली.

प्रवेशद्वार उभारण्याची ग्वाही
रेल्वे प्रशासनाने लेखी हमी देत, येत्या दहा दिवसांत जागेचे मोजमाप करून पाडण्यात आलेले प्रवेशद्वार पुन्हा उभारण्यात येईल, असे आश्वासन दिले. ही लेखी हमी मिळाल्यानंतरच ग्रामस्थांनी पोलीस ठाण्यातून माघार घेतली. या घटनेनंतर गावात संतापाचे वातावरण असून, पूर्वसूचना न देता धार्मिक स्थळाशी संबंधित बांधकामावर कारवाई केल्याबद्दल ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !