नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे दोषी ; फाशीच्या शिक्षेची पीडित कुटुंबीयांची मागणी
पुणे (25 जून 2026) : राज्याचे लक्ष लागून असलेल्या नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणाचा 29 रोजी निकाल येणार आहे. न्यायालयाने आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवले असून सरकारी पक्षाने या नराधमासाठी केवळ आणि केवळ ‘फाशीच्या शिक्षेची’ मागणी केली आहे. न्यायालय आता काय अंतिम निकाल सुनावणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत.
नसरापूर प्रकरणात न्यायालयाचे भीमराव कांबळेवर ताशेरे
नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार आणि खून प्रकरणात आरोपी भीमराव कांबळे याला दोषी ठरवताना न्यायाधीश एस.आर.साळुंखे यांनी कठोर शब्दांत ताशेरे ओढले. भीमराव कांबळेला कोणताही पश्चाताप नाही, तो दयेच्या लायकीचाही नाही, असे न्यायालयाने नमूद केले. ज्या चिमुकलीने त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याच मुलीवर तब्बल 39 मिनिटे अत्यंत घृणास्पद अत्याचार करण्यात आल्याचे न्यायालयाने निरीक्षण नोंदवले. वैद्यकीय तपासणीतही आरोपीने पीडितेवर विविध प्रकारचे लैंगिक अत्याचार केल्याचे स्पष्ट झाल्याने न्यायालयाने आरोपीविरोधातील सर्व आरोप सिद्ध झाल्याचे म्हटले.

केवळ एका महिन्यात सुनावणी पूर्ण
या संवेदनशील प्रकरणात तपास यंत्रणा आणि न्यायालयाने अत्यंत कौतुकास्पद व वेगाने काम केले आहे. केवळ 16 दिवसांत पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र (चार्जशीट) दाखल केले. त्यानंतर पुढील 16 दिवसांत सर्व महत्त्वाच्या साक्षी व पुरावे नोंदवून घेण्यात आले. यानंतर पुढील 20 दिवसांमध्ये अंतिम युक्तिवादही पूर्ण करण्यात आला. सर्व प्रक्रिया अतिशय वेगाने पार पडल्यामुळे महिन्याभराच्या आतच हा खटला निकालाच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे.
29 रोजी येणार अंतिम फैसला
बचाव पक्षानेही आपला अंतिम युक्तिवाद पूर्ण केला असून दोन्ही बाजूंचे म्हणणे सविस्तरपणे ऐकल्यानंतर न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल राखून ठेवला होता. 29 रोजी न्यायालय दोषीला कोणती कठोर शिक्षा सुनावणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे डोळे लागले आहेत. नसरापूरमधील या अत्यंत संतापजनक प्रकरणामध्ये नराधमाला फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी तीव्र भावना नागरिकांसह पीडीतेच्या कुटूंबाकडून केली जात आहे.
