आधी नीटचा आता टीईटी परीक्षेचा पेपर फुटला : राज्य शासनाकडून उद्याची परीक्षा रद्द

भिवंडीत प्रश्नपत्रिका विकणार्‍या तिघांना अटक : परीक्षा परिषदेचा निर्णय : फेरपरीक्षेसाठी पुन्हा शुल्क नाही


After the NEET paper, now the TET exam paper has been leaked; State Government cancels tomorrow’s exam. मुंबई (27 जून 2026) : आधी नीट परीक्षेचा पेपर फुटल्याने टीकेची झोड उठली असतानाच आता रविवार, 27 रोजी होणार्‍या राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षेचा पेपर फुटल्याने ही परीक्षाच रद्द करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली आहे. परीक्षेतील सावळा-गोंधळानंतर विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, भिवंडीत संशयीतांकडे परीक्षेचा पेपर मिळाल्यानंतर तीन संशयीतांना अटक करण्यात आली व त्यानंतर शासनाने परीक्षा रद्दचा निर्णय घेतला.
देशभरात नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणानंतर आता आणखी एका महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

1.5 कोटींची मागणी : आंतरराज्य टोळीतील तिघांना अटक
राज्यात रविवार, 28 जून रोजी होणार्‍या शिक्षक पात्रता (टीईटी) परीक्षेचा पेपरफुटीचा मोठा कट भिवंडी पोलिसांनी उधळून लावत तीन आरोपींना अटक केली. गोपनीय माहितीच्या आधारे कोनगाव पोलिसांनी सापळा रचून आरोपींकडून प्रश्नपत्रिकेचे चार संच जप्त केले. शिक्षण विभागाने पडताळणी केल्यानंतर हेच मूळ प्रश्नपत्रिका असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांच्या तपासात धक्कादायक बाब समोर आली असून, आरोपींनी हा पेपर विकण्यासाठी तब्बल दीड कोटी रुपयांच्या आगाऊ रकमेची मागणी केली होती. हे पेपर पुढे विविध उमेदवारांना विकण्याचा त्यांचा कट होता.



अटक करण्यात आलेल्या तिघांपैकी एक आरोपी हरियाणाचा, तर दोघे बिहारचे असून ते दिल्लीहून प्रश्नपत्रिका घेऊन भिवंडीत आले होते. आरोपींकडून मोबाईल फोन, डेबिट-क्रेडिट कार्डसह अन्य साहित्यही जप्त करण्यात आले आहे.

राज्यभरात तपास पथके रवाना
या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी पोलिसांनी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन केले असून त्याचे नेतृत्व डीसीपी पवन बनसोड करतील. पेपर दिल्लीतून कसा बाहेर आला, शिक्षण विभागातील कोणाचा सहभाग आहे का आणि या रॅकेटचे आणखी धागेदोरे कोणते, याचा तपास सुरू आहे. विविध राज्यांमध्येही पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत.

नव्याने होईल परीक्षा : शुल्क लागणार नाही
परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या प्रकरणात उमेदवारांची कोणतीही चूक नसल्याने ज्यांनी आधीच नोंदणी केली आहे, त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. परीक्षेची नवी तारीख दोन ते तीन दिवसांत जाहीर केली जाईल. त्यांनी सांगितले की, ही परीक्षा पुन्हा घेण्यासाठी नियोजनाची सुमारे तीन आठवड्यांची प्रक्रिया असते. चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.

1028 केंद्रांवर पुन्हा होणार परीक्षा
राज्यातील 37 शहरांतील 1028 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा पुन्हा आयोजित करण्यात येणार आहे. यंदाच्या टीईटी परीक्षेसाठी सुमारे 6 लाख 1 हजारांहून अधिक उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यामुळे लाखो उमेदवारांवर या निर्णयाचा परिणाम झाला आहे.

टीईटी पेपरफुटीनंतर अंबादास दानवे कडाडले
या पेपरफुटीवर तीव्र संताप व्यक्त करत ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी महायुती सरकारला धारेवर धरले आहे. दानवे म्हणाले, या संपूर्ण पेपरफुटीमध्ये सरकारचाच सहभाग आहे. या सरकारला एक साधी टीईटी परीक्षा देखील नीट घेता येत नाही. प्रत्येक वेळी सरकारकडूनच पेपर फोडले जात आहेत आणि सध्या संपूर्ण राज्य ‘भगवान भरोसे’ सुरू आहे.

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !