आय.एस. तुकाराम मुंढे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ द्या ! : शिशिर जावळे यांची राज्य सरकारकडे मागणी
भुसावळ (6 जुलै 2026) : प्रशासकीय कारकिर्दीत तब्बल 26 ते 27 वेळा बदल्यांचे आघात सोसूनही भ्रष्टाचाराविरोधात कधीही तडजोड न करणारे, निगर्वी, निस्वार्थी आणि पारदर्शक कारभाराचे एकमेव प्रणेते, राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांना राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘महाराष्ट्र भूषण’ देऊन सन्मानित करावे, अशी आग्रही आणि घणाघाती मागणी सामाजिक कार्यकर्ते शिशिर डी.जावळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे.
प्रशासकीय ‘रोल मॉडेल’ म्हणून ओळख
तुकाराम मुंढे यांनी आपल्या प्रदीर्घ प्रशासकीय प्रवासात जिथे जिथे जबाबदारी सांभाळली, तिथे त्यांनी कायद्याचे राज्य निर्माण केले. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता, सामान्यांच्या न्याय्य हक्कासाठी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी त्यांनी घेतलेले निर्णय आज अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत. त्यांना होणार्या वारंवार बदल्या हे त्यांच्या प्रामाणिकपणाचेच फळ आहे, असे मत जावळे यांनी व्यक्त केले आहे.

‘महाराष्ट्र भूषण’साठी प्रशासकीय नायक पात्र
‘महाराष्ट्र भूषण’ हा पुरस्कार अशा व्यक्तीला दिला जातो ज्याने आपल्या क्षेत्रात अलौकिक आणि अद्वितीय कार्य केले आहे. तुकाराम मुंढे यांचे प्रशासकीय सेवेतील योगदान हे निस्वार्थ सेवाभावाचे उत्तम उदाहरण आहे. अशा निष्कलंक आणि कर्तृत्ववान अधिकार्याचा सन्मान केल्याने राज्यातील प्रशासकीय व्यवस्थेत सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढ्याला अधिक बळ मिळेल, असे शिशिर जावळे यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात म्हटले आहे.
जनतेची भावना राज्य सरकारपर्यंत
भुसावळ येथील सामाजिक कार्यकर्ते शिशिर जावळे यांनी या मागणीसाठी थेट मंत्रालयापर्यंत पाठपुरावा करण्याचा निर्धार केला आहे. समाजातील एका घटकाचा आवाज बनून त्यांनी केलेली ही मागणी सध्या राज्यभरात चर्चेचा विषय ठरत असून, तुकाराम मुंढे यांच्यासारख्या खर्या ‘प्रशासकीय नायकाचा’ गौरव व्हावा, अशी अपेक्षा सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.