रावेरात वाहतुकीला अडथळा ठरणार्या 200 हून अधिक टपर्या व शेडस् हटवले
रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास : पुन्हा अतिक्रमण न होण्यासाठी पालिकेकडून उपाययोजनांची अपेक्षा
रावेर (8 जुलै 2026) : शहरातील वाढते अतिक्रमण डोकेदुखी ठरून साततत्याने छोट्या-मोठ्या अपघातांच्या व वादाच्या घटना समोर येत होत्या. या पार्श्वभूमीवर रावेर पालिका व पोलिसांनी संयुक्तपणे मोहिम राबवत सुमारे 200 हून अधिक टपर्या व पक्के शेडस् हटवले. अतिक्रमण निघाल्यानंतर शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला आहे. अनेक वर्षांनंतर या रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला असून नागरिकांमधून मोठे समाधान व्यक्त होत आहे. पालिकेने आता पुन्हा नव्याने अतिक्रमण न होण्यासाठी पथक स्थापन कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे.
या भागातील रस्ते झाले मोकळे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बर्हाणपूर-अंकलेश्वर महामार्ग, स्टेशन रोड आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य रस्त्यावरील तब्बल 200 हून अधिक टपर्या व पक्के शेड्स या मोहिमेत हटवण्यात आले. प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

पादचार्यांना चालणेही कठीण
शहरात पक्क्या दुकानांसमोर दुकानदारांनी अनधिकृतपणे तात्पुरते पत्र्याचे शेड्स आणि ओटे बांधल्याने पादचार्यांना चालणे कठीण झाले होते आणि अपघातांचा धोका वाढला होता. नगरपालिका तर्फे अतिक्रमण काढण्यात येणार्या भागात दवंडी दिल्याने अतिक्रमण काढण्यासाठी सर्व दुकानदार सरसावले होते. अचानक सुरू झालेल्या या धडक कारवाईमुळे अतिक्रमण धारकांमध्ये एकच पळापळ उडाली. काहींनी स्वतःहून आपले साहित्य हटवण्यास सुरुवात केली तर अनेकांचे साहित्य प्रशासनाने जप्त केले.
यांची होती उपस्थिती
प्रशिक्षणार्थी उप जिल्हाधिकारी तथा रावेर तहसीलदार दीपा जेधे, उपविभागीय पोलीस अधीक्षक अनिल बडगुजर, पोलीस निरीक्षक संदीप पाटील, मुख्याधिकारी अविनाश गांगोडे यांचे उपस्थितीत येथील पोलिस ठाण्यापासून अतिक्रमण काढण्यासाठी सुरवात झाली.