राज्यात कायदा-सुव्यवस्था ढासळली : अंबादास दानवेंकडून सरकार धारेवर
Law and order in the state has collapsed : Ambadas Danve slams the government मुंबई (10 जुलै 2026) : राज्यात कायदा-सुव्यवस्था ढासळली असून भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि प्रशासनातील अनागोंदीला सरकारच जबाबदार असल्याचा आरोप राज्याचे माजी विधान परिषद विरोधी पक्षनेते, आमदार अंबादास दानवे यांनी करीत राज्य सरकारवर चौफेर घणाघात केला. गृह, महसूल, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम या चार विभागांतील कारभारावर त्यांनी सडकून टीका केली.
राज्याची स्थिती चिंताजनक
महाराष्ट्रात अल्पवयीन मुली बेपत्ता होण्याचे आणि मानवी तस्करीच्या घटना चिंताजनक आहे. मागील वर्षात 26 हजार 137 महिला आणि 7 हजार 777 अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्या आहेत, हा केवळ कायदा-सुव्यवस्थेचा नव्हे तर सामाजिक सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. महिलांवरील अत्याचार, बाललैंगिक अत्याचार, अपहरण, मानवी तस्करी आणि कैद्यांच्या अनैसर्गिक मृत्यूच्या घटनांमध्ये महाराष्ट्राची स्थिती चिंताजनक असल्याची टीका अंबादास दानवे यांनी केला.

राज्यात कायदा-सुव्यवस्था ढासळली
राज्यातील कायदा-सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे. डोंबिवलीतील नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी एका महिलेला मारहाण केली असून मुरबाडचे आमदार यांनी विश्वनाथ रामचंद्र पनवेलकर यांना धमक्या दिल्याचा आणि गुंड एजाज लकडावाला याच्या नावाचा उल्लेख असलेल्या पत्राचा संदर्भ सभागृहात देत, संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी दानवे यांनी केली.
मीरा-भाईंदर येथील शिंदे गटाच्या महिला आघाडीच्या जिल्हा संघटक निशा नरेश नार्वेकर यांनी मुख्यमंत्री आणि पोलीस महासंचालकांना दिलेल्या पत्राचाही दानवे यांनी उल्लेख केला. या पत्रात भाजपाशी संबंधित काही व्यक्तींवर महिलांवरील अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये राजाश्रय मिळत आहे. या पत्रात गंगाशाम सुंदर झा, राजेश चव्हाण, लक्ष्मण गणपत जंगम, अनिल बाबुराव भोसले, नवीन मुक्तेश्वर सिंह, संजय वसंत थरथरे, दिनेश तेजराम जैन आणि प्रशांत दळवी हे सहभागी सहभागी असल्याचे अंबादास दानवे यांनी सांगितले.
पोलीस अधिकार्यांवर लैंगिक छळाचे आरोप
मुंबईतील एका पोलीस अधिकार्यावर अल्पवयीन मुलीच्या लैंगिक छळाचे आरोप, अकोल्यातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकावरील आरोप, नवी मुंबईतील रबाळे पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीबाबत उपस्थित केलेले प्रश्न तसेच संभाजीनगर आणि केज येथील घटनांचा उल्लेख करत दानवे यांनी पोलीस यंत्रणेच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पिंपरी-चिंचवड येथील विषारी दारू प्रकरणाचा उल्लेख करून दारूबंदी कायद्याची खुलेआम पायमल्ली होत असून निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. अशा घटना रोखण्यात सरकार अपयशी ठरल्याची टीकाही दानवे यांनी केली.
पनवेल, नाशिक, वसई-विरार, अहमदपूर, दिंडोरी, भूम तसेच म्हाडा आणि सिडकोमधील कथित अनियमिततेची उदाहरणे देत महापालिका, नगरपरिषदा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भ्रष्टाचाराचे जाळे पसरल्याचा आरोप दानवे यांनी केला. भूमी अभिलेख फेरफार, निविदा प्रक्रियेतील गैरव्यवहार, पाणीपुरवठा योजना, कचरा व्यवस्थापन आणि कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक अनियमिततेकडे अंबादास दानवेंनी सभागृहाचे लक्ष वेधले.
भ्रष्टाचार, गुन्हेगारी, महिलांची असुरक्षितता, ढासळलेली कायदा-सुव्यवस्था आणि प्रशासनातील निष्क्रियता यामुळे राज्यातील जनतेचा शासनावरील विश्वास उडत असल्याची टीका करत या सर्व प्रकरणांची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी दानवे यांनी सभागृहात केली.