प्रेयसीला केलेला कॉल ठरला तपासाचा दुवा : 50 कोटींच्या खंडणीप्रकरणात राजस्थानसह हरियातील चार आरोपींना अटक


Call made to girlfriend proves to be a lead in the investigation: Four accused from Rajasthan and Haryana arrested in ₹50 crore extortion case पुणे (10 जुलै 2026) : लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या नावाचा वापर करून पुण्यातील एका बड्या स्टील व्यावसायिकाकडे 50 कोटी रुपयांची खंडणी मागून दहशत पसरवण्यासाठी गोळीबार करणार्‍या आंतरराज्यीय टोळीचा पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. पोलिसांनी या घरच्या भेद्यासह हरियाणा आणि राजस्थानमधून एकूण चार आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून तीन गावठी पिस्तुले आणि 30 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

या आरोपींना अटक
पवान प्रकाशराम बारड (24, रा. हनुमानगड, राजस्थान), सत्यप्रकाश कालुराम शिलोरा (25, हांडेवाडी), रवीकुमार राजेंद्रकुमार जांगडा (33, रा. सिरसा, हरियाणा) अशी अटक आरोपींची नावे आहेत. आरोपींच्या एका अल्पवयीन साथीदाराला देखील ताब्यात घेण्यात आले.

पेमंतरवाडी बायपास रोडवरील गोळीबाराचा थरार
22 जून रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास उरुळी देवाची जवळील मंतरवाडी-कात्रज बायपास रोडवर असलेल्या एका स्टील व्यावसायिकाच्या गोदामावर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी बेछूट गोळीबार केला होता. गोळीबार केल्यानंतर आरोपींनी ‘लॉरेन्स बिश्नोई टोळी’च्या नावाने 50 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. याप्रकरणी फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेने समांतर तपास सुरू केला होता.

पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली असता, खंडणी मागितलेल्या स्टील व्यावसायिकाकडेच काम करणारा सत्यप्रकाश शिलोरा हा या कटाचा मुख्य सूत्रधार निघाला. सत्यप्रकाश हा व्यावसायिकाच्या दैनंदिन हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होता. ’लाइव्ह अपडेट्स’ तो पवन, रवीकुमार आणि थेट ’आरजू बिश्नोई’ला देत होता. या माहितीच्या आधारे आरजू बिश्नोई फोनवरून व्यावसायिकाला धमकावत होता.

पण प्रेयसीला केलेला फोन नडला
गोळीबार केल्यानंतर पवन आणि रवीकुमार यांनी उंड्री परिसरापर्यंत चेसी क्रमांक घासून पुसलेल्या दुचाकीवरून प्रवास केला. त्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी रिक्षा, कॅब बदलून नाशिक गाठले. तिथे कपडे बदलून ते गुजरात (सुरत) मार्गे राजस्थानमधील सिकर येथे पळून जाण्याच्या तयारीत होते. पोलिसांनी तपासादरम्यान पवनच्या पुण्यात राहणार्‍या नातेवाइकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. ही बातमी पवनपर्यंत पोहोचताच त्याने घाईघाईत आपल्या प्रेयसीला मेसेज करून सावध राहण्याचा इशारा दिला. पवनने प्रेयसीशी साधलेला हाच संपर्क पोलिसांसाठी सुवर्णसंधी ठरला.

सहा पथके आरोपींच्या मागावर
गुन्हे शाखेच्या 6 पथकांनी पंजाब, हरियाणा आणि राजस्थानच्या दुर्गम सीमाभागात सलग पाच दिवस तळ ठोकला होता. संशयितांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी तब्बल 15 हजार किलोमीटरचा खडतर प्रवास केला आणि मार्गावरील एक हजाराहून अधिक सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचे फुटेज तपासले. शेवटी आरोपींच्या कुटुंबीयांवर कायदेशीर दबाव निर्माण केल्यानंतर त्यांचे लपण्याचे ठिकाण उघड झाले आणि पोलिसांना यश आले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !