पर्यटकांना अंमली पदार्थांच्या खोट्या संशयाखाली अडवून खंडणी मागितली : पाच पोलिसांचे निलंबन

गुन्हा दाखल होताच आरोपींना अटक : पोलिस वर्तुळात प्रचंड खळबळ


Five police personnel suspended for detaining tourists on false suspicion of drug possession and demanding extortion money पुणे (10 जुलै 2026) : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पर्यटकांना अंमली पदार्थांच्या खोट्या संशयाखाली अडवून खंडणी मागणार्‍या महामार्ग सुरक्षा पोलिसांच्या खंडाळा पथकातील पाच कर्मचार्‍यांना तातडीने निलंबित करीत त्यांना पुणे ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींची आता खात्यांतर्गत सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. न्यायालयाने आरोपींना 13 जुलै 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

काय आहे प्रकरण
सूत्रांनुसार, 5 जुलै 2026 रोजी दुपारी साडेचार वाजता विमाननगर, पुणे येथील रहिवासी उमेश शर्मा (28) हे आपल्या सहकार्‍यांसह चारचाकी वाहनाने लोणावळ्याकडे पर्यटनासाठी जात होते. पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील मौजे ताजे (ता.मावळ) गावच्या हद्दीत अंबर दिवा लावलेल्या एका वाहनातील सहा जणांनी त्यांची गाडी थांबवली.

आरोपींनी पर्यटकांकडे अंमली पदार्थ असल्याचा खोटा संशय व्यक्त करत कारवाई करण्याची भीती दाखवली आणि पाच लाख रुपयांची खंडणी मागितली. एवढेच नाही तर त्यांना जबरदस्तीने तळेगाव दाभाडे परिसरात नेऊन एटीएममधून पैसे काढून देण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. या गंभीर प्रकारानंतर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तातडीने तपास सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे, या गुन्ह्यात हायवे ट्रॅफिक ड्युटीवर असणार्‍या खंडाळा पथकातील पोलीस अंमलदार, होमगार्ड आणि वॉर्डन यांचा थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.

पाच कर्मचार्‍यांचे निलंबन
पोलिसांनी पोलीस अंमलदार अमोल महादेव ननावरे (36), तुषार बाळू ढावरे (33), होमगार्ड तुषार संजय घाडगे (41), किसन कोंडीबा बांबले (32) आणि ट्रॅफिक वॉर्डन नितेश दीपक चव्हाण (32) या पाच आरोपींना अटक केली. तपासात खंडाळा पथकातील पोलीस अंमलदार अमोल अशोक वायकर याचाही या गुन्ह्यात सहभाग असल्याचे समोर आले आहे.

महामार्ग सुरक्षा पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी पवार यांनी पाठवलेल्या अहवालावरून दोषी पोलीस अंमलदारांवर तत्काळ निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या सर्व आरोपींची खात्यांतर्गत सखोल चौकशी केली जात आहे. गुन्हेगारी कृत्यात पोलिसांचा सहभाग आढळल्याने खाकी पुन्हा डागाळल्याने जनतेतून संताप व्यक्त होत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !