अजमेरहून परतणार्या नाशिकच्या भाविकांवर काळाचा घाला : शिरपूरजवळ भरधाव ट्रक इनोव्हावर धडकल्याने दोघे जागीच ठार
चौघे गंभीर जखमी : अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प
Tragedy strikes Nashik pilgrims returning from Ajmer : Two killed on the spot after a speeding truck rams into their Innova near Shirpur शिरपूर (शनिवार, 18 जुलै 2026) : अजमेर दर्ग्यावरून परतणार्या भाविकांच्या वाहनाला भरधाव ट्रकने उडवल्याने झालेल्या भीषण अपघातात दोघा भााविकांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य चौघे गंभीर जखमी झाले. मन विषन्न करणारा हा अपघात मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर फाट्याजवळ शनिवार, 18 जुलै रोजी सकाळी घडला. या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.
दोघे जागीच ठार
नमाज सादिक शेख (28) व मैनुद्दीन रफिक शेख (34, दोघे रा.शिवाजी चौक, नाशिक) अशी मृतांची नावे आहेत तर मोसीन मेहमूद शेख (32), अयान अझरुद्दीन शेख (20), साबीर मोईन शेख (19) आणि साहील मेहमूद शेख (25) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी धुळे येथे हलविण्यात आले.


असा घडला अपघात
प्राथमिक माहितीनुसार, अजमेर येथील दर्ग्याचे दर्शन घेऊन नाशिककडे निघालेली इनोव्हा कार (एम.एच.05 सी.व्ही.1001) शनिवारी सकाळी सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास शिरपूर फाट्याजवळ भारत सर्व्हिस सेंटरसमोर आल्यानंतर भरधाव ट्रकने कारला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता इतकी होती की कारचा अक्षरशः चक्काचूर झाला.
कारमध्ये एकूण सात प्रवासी प्रवास करत होते. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, पोलिस आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र दोघांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघाताचे नेमके कारण काय, ट्रक चालकाचा वेग की निष्काळजीपणा, याचा तपास पोलिसांकडून सुरू असून ट्रक चालकाविरुद्ध पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.