धुळ्यात गुजरातच्या सराफाचे दिड कोटींचे दागिने चोरले : सहा तासात चोरटा आझादनगर पोलिसांच्या जाळ्यात

सीसीटीव्ही व गोपनीय माहिती ठरली तपासातील दुवा : एक किलो 612 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त


धुळे (शनिवार, 18 जुलै 2026) : धुळ्यातील सराफा बांधवांना दागिणे विक्रीसाठी आलेल्या गुजरातच्या व्यापार्‍याकडील तब्बल एक कोटी 55 लाखांच्या दागिण्यांची चोरी शुक्रवार, 17 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास झाल्याने खळबळ उडाली. आझादनगर पोलिसांनी गुन्ह्यांचे सोपस्कार पार पाडत असताना दुसरीकडे खबर्‍यांचे नेटवर्क अ‍ॅक्टीवेट केले तसेच सीसीटीव्हीची पडताळणी सुरू झाल्यानंतर स्थानिक आरोपी निष्पन्न केला. पोलिसांनी आरोपीला बोलते करताच त्याने गुन्ह्याची कबुली देत दागिने काढून दिले. अवघ्या सहा तासात आझादनगर पोलिसांनी गुन्हा उघडकीस आल्याने पोलिसांच्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

व्यापारी बाहेर पडताच केले काम फत्ते
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार, 17 जुलै 2026 रोजी दुपारी 4 ते सायंकाळी 7.30 वाजेदरम्यान गुजरातमधील जुनागड येथील सराफ व्यावसायीक अश्विनभाई दुर्लभजीभाई काचलिया (65, जुनागड, गुजरात राज्य) हे धुळ्यातील द्वारकामाई लॉजच्या रूम क्रमांक 219 मध्ये मुक्कामी होते. त्यांनी सोन्याचे दागिने असलेली बॅग खोलीत ठेवून खोलीला कुलूप लावले आणि व्यापार्‍यांकडे ऑर्डर घेण्यासाठी बाहेर गेले.
काही वेळाने परत आल्यानंतर खोलीचा दरवाजा उघडा असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. आत पाहणी केली असता, सोन्याच्या दागिन्यांची बॅग गायब असल्याचे दिसून आले. यानंतर त्यांनी तातडीने आझादनगर पोलिसात तक्रार दाखल केली.


सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीपर्यंत पोहोचले पोलिस
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रभारी अधिकारी तथा पोलिस निरीक्षक विनोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने तातडीने तपास सुरू केला. घटनास्थळाची पाहणी, परिसरातील साक्षीदारांची चौकशी आणि सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करण्यात आली. तांत्रिक माहिती आणि गोपनीय सूत्रांच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपी हितेश सुरेश सोनी (42, रा. गुलाबजी भवनजी कंपाऊंड, मालेगाव रोड, धुळे) याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीस गेलेले एक किलो 612 ग्रॅम वजनाचे विविध डिझाइनचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले.

सर्व मुद्देमाल जप्त
पोलिसांनी जप्त केलेल्या मुद्देमालामध्ये मंगळसूत्र, विविध प्रकारच्या अंगठ्या, कानातील दागिने, ब्रेसलेट, चेन, पेंडल, बांगड्या, जेंट्स टॉप्स आदींचा समावेश असून त्याची एकूण किंमत एक कोटी 55 लाख रुपये इतकी आहे.

यांनी उघडकीस आणला गुन्हा
ही कारवाई पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, पोलीस उपअधीक्षक राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली आझादनगर प्रभारी विनोद पाटील, सहा.निरीक्षक विजय ठाकूर, अंमलदार गौतम सपकाळे, योगेश शिरसाठ, रफिक पठाण, शांतीलाल सोनवणे, संदीप कढरे, मनोज बागुल, विजय शिरसाठ, योगेश शिंदे, अनिल शिंपी, मकसुदखान पठाण, पंकज जोंधळे आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !