आठ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित शेवट : धुळ्यात आर्थिक वादातून रिक्षा चालकाची हत्या करीत मृतदेह तापी नदीत फेकला

धुळे एलसीबीकडून अवघ्या चार दिवसांत गुन्ह्याची उकल : मुख्य आरोपीसह साथीदारांचा सहभाग उघड


धुळे (शनिवार, 18 जुलै 2026) : आठ वर्षांची घट्ट मैत्री अखेर पैशांच्या व्यवहारातून वैरात बदलली आणि मित्रानेच रिक्षा चालक असलेल्या मित्राचा गळा आवळत मृतदेह तापी पात्रात फेकला. चार दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेचा धुळे गुन्हे शाखेने अत्यंत कौशल्याने तपास करीत या गुन्ह्याची उकल केली. आरोपी मित्राला बेड्या ठोकण्यात आल्या असून गुन्ह्यात सहभागी अन्य तीन साथीदारांचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे. संजय मनीलाल भांडारकर असे खून झालेल्या रिक्षा चालकाचे नाव आहे तर आरोपी गणेश उर्फ संभाजी पाटील (सुभाष नगर, बाल गोपाल तालीमजवळ, जुने, धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

काय घडले धुळ्यात ?
धुळ्यातील रिक्षा चालक संजय मनीलाल भांडारकर उर्फ बंटी अण्णा हे 9 रोजी बेपत्ता झाल्यानंतर कुटूबियांनी त्यांचा शोध सुरू केला तर गोंदूर-मोराणे रस्त्यावरील निकम पॉलिटेक्नीक कॉलेजजवळ भांडारकर यांची रिक्षा (एम.एच.18 बी.एच.0193) बेवारसरित्या आढळल्याने संशय बळावला. पश्चिम देवपूर पोलिसात मिसिंग दाखल करण्यात आल्यानंतर गुन्हे शाखेचे हवालदार पवन गवळी यांना संशयीत गणेश पाटील याने काहीतरी गुन्हा केल्याची माहिती मिळाली. संशयीताला ताब्यात घेतल्यानंतर गणेश पाटील ऊर्फ भोला याने संजय भांडारकरचा ऊसवारीच्या पैशांच्या व्यवहारातून वाद झाल्याने गळा दाबून खून केल्याची कबुली दिली. त्यानंतर तीन साथीदारांच्या मदतीने मृतदेह धुळे-शिरपूर महामार्गावरील सावळदे पुलावरून तापी नदीत फेकून दिल्याचे कबुल केले.


अखेर मृतदेह सापडला : आरोपीविरोधात खुनाचा गुन्हा
पोलिसांनी नदीपात्रात शोधमोहीम राबविली. गुरुवार, 16 जुलै रोजी सकाळी स्थानिकांच्या मदतीने नदीतून एका पुरुषाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. नातेवाईकांनी तो मृतदेह संजय भांडारकर याचाच असल्याची ओळख पटविली. शवविच्छेदनानंतर खून झाल्याचे स्पष्ट झाल्याने धुळे शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

आठ वर्षांच्या मैत्रीचा रक्तरंजित शेवट
पोलीस तपासात रिक्षा चालक संजय भांडारकर आणि गणेश पाटील हे गेल्या आठ वर्षांपासून मित्र असल्याचे निष्पन्न झाले. संजय भांडारकर यांनी आरोपी गणेशला उसनवारीने पैसे दिले होते व ते पैसे परत मागण्यात आल्याने त्यातून उभयंतांमध्ये वाद सुरू होते. आरोपीने साथीदारांच्या मदतीने मित्राचा आधी गळा आवळला व नंतर त्याला तापी पात्रातून फेकून दिले. विशेष म्हणजे रिक्षा चालक संजय बेपत्ता झाल्यावर आरोपी गणेश हा मृताचा मुलगा गौरवसोबत शोध घेत असल्याचा बनाव करीत होता मात्र धुळे गुन्हे शाखेने तपासात त्याचा डाव उधळला.

यांनी उघडकीस आणला खुनाचा गुन्हा
ही कारवाई पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, सहा.निरीक्षक दीपक ढोके, उपनिरीक्षक शाम निकम, अंमलदार पवन गवळी, अमोल पाटील, सुनील पाटील, सदेसिंग चव्हाण, शिरीष भदाणे, पंकज खैरमोडे, मयूर पाटील, तुषार सूर्यवंशी, अतुल निकम, अमोल जाधव, कैलास महाजन आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !