जंतरमंतरवरील जागा सोडू नका ; वेळ पडल्यास सर्व मराठे दिल्लीत येतील : मनोज जरांगे
नवी दिल्ली (बुधवार, 22 जुलै 2026) : काहीही झालं तरी जंतरमंतरवरील जागा सोडू नका, वेळ पडल्यास सर्व मराठे दिल्लीत येतील, असा शब्द जरांगे यांनी विद्यार्थ्यांना दिला आहे. विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करणार्या सरकारला ‘उलटं करण्याची’ ताकद आपल्यात आहे. पुन्हा हल्ला झाल्यास नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका त्यांनी यावेळी घेतली. नवी दिल्लीतील जंतरमंतरवर जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानंतर मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारवर घणाघाती टीका केली.
वेळ पडल्यास सर्व मराठे दिल्लीत येतील
जंतरमंतरवर विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मनोज जरांगे यांनी त्यांना या लढ्यात खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन केले. आंदोलन शांततेच्या मार्गानेच करा आणि काहीही झालं तरी ही जागा सोडू नका, असा सल्ला त्यांनी आंदोलकांना दिला. आवश्यकता पडल्यास आपण संपूर्ण ताकदीनिशी विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहू, अशी ग्वाही देताना ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी फक्त एक हाक मारावी, आम्ही अत्यंत मोठ्या संख्येने या आंदोलनात सामील होऊ. वेळ पडली तर सर्व मराठे दिल्लीत येतील आणि हे सरकार उलटवून लावण्याची ताकदही आमच्यात आहे.
पुन्हा हल्ला केल्यास महाराष्ट्रात फिरू देणार नाही
विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करत जरांगेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. सध्याचे सरकार हे विद्यार्थ्यांचे मुडदे पाडण्याचे काम करत आहे, असा संतापजनक आरोप त्यांनी केला. आज संपूर्ण देश आणि राज्य या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगितले. जर विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज केला किंवा त्यांच्यावर हात उचलला तर या नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा थेट इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला..
सरकारचा माज उतरवावा लागेल
दिल्लीला पोहचण्यापूर्वी माध्यमांना प्रतिक्रिया संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करताना जरांगे पाटील यांनी सरकारवर सडकून टीका केली. ते म्हणाले, आतापर्यंत दिल्लीतील आंदोलन अतिशय शांततेत सुरू होते परंतु सरकारने अमानुषपणे विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करायला लावला. सरकार इतक्या क्रूरपणे वागू शकते, हे मी पहिल्यांदाच पाहत आहे. मुलांचे पाय तुटेपर्यंत त्यांना मारहाण करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत, जर हे सरकार विद्यार्थ्यांचे भविष्य पाहू शकत नसेल, तर त्यांची मस्ती उतरवावीच लागेल, असा इशारा त्यांनी दिला.




