पहिल्याच पावसात यावल-पिंप्री रस्त्याची दुरवस्था : शाळकरी मुलांची बस चिखलात अडकली
यावल (शुक्रवार, 24 जुलै 2026) : यावल तालुक्यातील पिंप्री या गावात जाणार्या रस्त्यात बुधवारी एसटी बस चक्क चिखलात फसल्याने विद्यार्थ्यांना रिप रिप पावसात पायपिट करीत शाळा गाठावी लागली. यावल-+पिंप्री रस्त्यात प्रचंड चिखल झाल्याने ग्रामस्थांमधुन प्रचंड संताप व्यक्त होत आहे.
रस्त्याचे भाग्य बदलणार कधी ?
गेल्या दशकभरापासून गावाला दर्जेदार डांबरी रस्त्याची प्रतीक्षा आहे. नुकतीच करण्यात आलेली वरवरची डागडूजी पहिल्याच पावसात वाहून गेल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. पिंप्री गावातून बुधवारी सकाळी शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन एसटी बस (क्रमांक एम. एच. 14 बी.टी. 3021) ही यावलकडे निघाली मात्र रिप-रिप पावसामुळे रस्त्यात मोठ्या प्रमाणात निर्माण झालेल्या चिखलात सदर बस फसली यात बस चालकाने चिखलातुन बस नेण्याचा प्रयत्न केला मात्र बस अनियंत्रीत होत असल्याचे जाणवले व बसमधील शालेय विद्यार्थी भयभित झाले.
जागेवरचं बस थांबवण्यात आली व रिप रिप पावसात बाल विद्यार्थ्यांनी शाळा गाठली.
सुदैवाने टळली दुर्घटना
चालकाने जागेवरचं बसवर नियंत्रण मिळवल्याने सुदैवाने दुर्घटना टळली. ग्रामस्थांच्या मते, ही केवळ नशिबाची साथ होती अन्यथा मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. रस्त्यावर जागोजागी खोल खड्डे, चिखलाचे साम्राज्य, पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक असलेल्या नाल्यांचा व छोट्या पुलांचा अभाव, तसेच नियमानुसार साईड पट्टी न केल्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात गावकर्यांना जीव मुठीत धरून या रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्याची केवळ डागडुजी न करता तांत्रिक निकषांनुसार दर्जेदार डांबरीकरण, आवश्यक साईड पट्ट्या, पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी नाले व छोटे पूल यांची तातडीने उभारणी करण्यात यावी, अशी मागणी माजी सरपंच मोहन एकनाथ सपकाळे, जितू कोळी यांनी केली आहे.
रस्त्या-अभावी अनेक अडचणी
रस्त्याच्या दुरवस्थेमुळे मागील काही वर्षांत अनेक रुग्णांना वेळेवर वैद्यकीय उपचार मिळू शकले नाहीत. रुग्णवाहिका वेळेत पोहोचू न शकल्याने काहींना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. ही परिस्थिती केवळ गैरसोयीची नसून मानवी जीवनाशी थेट संबंधित असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.



