पुणे विद्यापीठात 3 लाखांत डिग्री ? आमदार रोहित पवार म्हणाले हा तर सावित्रीबाई फुलेंच्या नावाचा अवमान !


पुणे (बुधवार, 29 जुलै 2026) : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काही कर्मचार्‍यांकडून लाखो रुपयांच्या मोबदल्यात बोगस पदव्या दिल्या जात असल्याच्या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केला आहे. शिक्षणाच्या क्षेत्रासाठी हा अत्यंत धक्कादायक प्रकार असल्याचे सांगत त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

शिक्षणाच्या मंदिरात बोगसगिरीचे दुकान
विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात काही कर्मचार्‍यांच्या संगनमताने बोगस पदव्या वाटल्या जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यावरून आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (द) पोस्ट करत प्रशासनावर टीका केली आहे. पुणे विद्यापीठात बोगस पदवी देण्याचे दुकानच काही कर्मचार्‍यांनी थाटल्याची बातमी अत्यंत धक्कादायक आहे. शिक्षणाच्या या पवित्र मंदिरात 3-3 लाखांत बोगस डिग्री मिळत असेल, तर हे अत्यंत चिंताजनक आहे, असे पवार म्हणाले.

सावित्रीबाईंच्या नावाचा अवमान
एकीकडे राज्यात विविध स्पर्धा परीक्षांना आणि शैक्षणिक परीक्षांना ‘पेपरफुटी’चा रोग लागला असताना, आता थेट विद्यापीठातूनच पदव्या विकल्या जात असल्याबद्दल रोहित पवारांनी संताप व्यक्त केला. ते आपल्या पोस्टमध्ये म्हणतात, या प्रकारामुळे विद्यापीठाच्या लौकिकाला काळिमा लागतोच, शिवाय ज्यांच्या नावाने हे विद्यापीठ ओळखले जाते, त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या नावाचाही हा मोठा अवमान आहे.

विद्यापीठाच्या कारभारावर निशाणा
या प्रकरणाच्या निमित्ताने रोहित पवार यांनी विद्यापीठाच्या कारभारावर आणि त्यावरील राजकीय प्रभावावरही थेट निशाणा साधला. या प्रकरणातील गांभीर्य ओळखून केवळ जुजबी कारवाई न करता मुळाशी जाण्याची मागणी रोहित पवार यांनी केली आहे. या प्रकरणाची अत्यंत सखोल चौकशी होऊन शिक्षणाच्या पवित्र मंदिरात बोगसगिरीचे दुकान उघडणार्‍यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे. राज्याचे राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती महोदयांनी यामध्ये स्वतः गांभीर्याने लक्ष घालावे, अशी अधिकृत विनंती रोहित पवार यांनी आपल्या पोस्टद्वारे केली आहे.

 

 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !