निःपक्षपाती काम, सोशल मीडियावर लक्ष अन् कायदा-सुव्यवस्थेला प्राधान्य : धुळे अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे
जयपालसिंह गिरासे
शिरपूर (गुरुवार, 30 जुलै 2026) : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस पाटीलांनी कोणत्याही राजकीय प्रभावापासून अलिप्त राहून निःपक्षपातीपणे कर्तव्य बजावावे, सोशल मीडियावरील वादग्रस्त, भडकाऊ व अफवाजन्य संदेशांवर सतत लक्ष ठेवून संशयास्पद बाबींची तातडीने पोलीस प्रशासनाला माहिती द्यावी तसेच गावागावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस यंत्रणेशी समन्वय साधून दक्षतेने काम करावे, अशा सूचना धुळे जिल्ह्याचे अपर पोलिस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांनी येथे केले.

दोन दिवसीय दौरा
थाळनेर पोलिस ठाण्याच्या वार्षिक तपासणीसाठी डॉ.देवरे यांनी दोन दिवसीय दौर्यांत 29 व 30 जुलै रोजी पोलीस ठाण्यास भेट दिली. पहिल्या दिवशी अधिकारी व अंमलदार यांच्या दप्तरांची तपासणी करण्यात आली तर दुसर्या दिवशी परेड, मॉब ड्रिल, गॅस गन व गॅस सेलच्या वापराबाबत मार्गदर्शन, पोलीस ठाण्यातील अभिलेखांची पाहणी तसेच पोलीस पाटील बैठक घेण्यात आली. यावेळी थाळनेर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक समाधान भाटेवाल तसेच थाळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व पोलीस पाटील उपस्थित होते.
कायदा-सुव्यवस्थेची जाणली स्थिती
पोलीस पाटील बैठकीत डॉ.देवरे यांनी प्रत्येक पोलीस पाटलाकडून त्यांच्या गावातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती, संवेदनशील प्रश्न, सामाजिक सलोखा, गुन्हेगारीची परिस्थिती तसेच स्थानिक स्तरावरील विविध घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला. गावपातळीवर शांतता, सामाजिक ऐक्य आणि नागरिकांचा विश्वास टिकवून ठेवण्यात पोलीस पाटलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विशेष उल्लेख करत त्यांनी पोलीस पाटीलांनी कोणत्याही पक्ष, गट किंवा व्यक्तीच्या प्रभावाखाली न येता केवळ कायदा व नियमांच्या चौकटीत राहून निष्पक्षपणे जबाबदारी पार पाडावी, असे सांगितले. निवडणुकीच्या काळात गावातील वातावरण शांत व विश्वासार्ह राहण्यासाठी पोलीस पाटलांनी अधिक सतर्क राहण्याचे आवाहनही त्यांनी केले.
सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावामुळे समाजात गैरसमज, अफवा किंवा तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन फेसबुक, व्हॉट्सप, इन्स्टाग्रामसह विविध माध्यमांवरील वादग्रस्त, आक्षेपार्ह अथवा समाजात तेढ निर्माण करणार्या पोस्टवर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. अशा प्रकारची कोणतीही बाब निदर्शनास आल्यास तात्काळ संबंधित पोलीस ठाण्याला माहिती देऊन कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सक्रिय सहकार्य करावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सर्व अधिकारी व अंमलदारांचा दरबार घेऊन त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेण्यात आल्या. काही समस्या तत्काळ त्यांच्या स्तरावर निकाली काढत उर्वरित बाबींवर आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना डॉ. देवरे यांनी दिल्या.
यानंतर पोलीस पाटील बांधवांच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, प्रभारी अधिकारी हेमंत पाटील तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
पोलीस पाटील हा तर गावचा ‘सजग प्रहरी’
कार्यक्रमात पिंप्रीचे पोलीस पाटील जयपालसिंह गिरासे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, गावातील शांतता ही केवळ पोलीस यंत्रणेची जबाबदारी नसून ती ग्रामस्थ, पोलीस पाटील आणि पोलीस प्रशासन यांच्या परस्पर विश्वासावर उभी असते. प्रत्येक पोलीस पाटील हा आपल्या गावाचा सजग प्रहरी म्हणून कार्य करत असतो. बदलत्या काळात सोशल मीडियामुळे आव्हाने वाढली असली तरी जनतेचा विश्वास, वस्तुनिष्ठ माहिती आणि तात्काळ समन्वय हीच कायदा-सुव्यवस्था टिकवून ठेवण्याची खरी ताकद आहे. वरिष्ठ अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका शांततापूर्ण, पारदर्शक आणि निःपक्षपाती वातावरणात पार पाडण्यासाठी आम्ही पोलीस प्रशासनाला सर्वोतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. यशस्वीतेसाठी गोपनीय शाखेचे हवालदार दिनेश महाले, प्रभारी रायटर उमाकांत वाघ, गुन्हे शाखेचे रवींद्र मोरे, हजेरी मेजर रावसाहेब पाटील, बारनिशी ललिता पाटील, लेखनिक अंमलदार विजय पाटील तसेच थाळनेर पोलीस ठाण्यातील सर्व बीट अंमलदार, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.