आई-आजीच्या गुण-गुणण्यातच लोकसाहित्याचे माधुर्य दडलेय

द्वारकाई व्याख्यानमाला : धुळ्याचे साहित्यिक प्रा.डॉ.सदाशिव सूर्यवंशी यांचे मत


भुसावळ (शुक्रवार, 31 जुलै 2026) : लोकसाहित्य कृषी संस्कृतीचा ठेवा आहे. ओव्या, भारूड, म्हणी, वाक्प्रचार भाषेला गोडवा निर्माण करतात. शालेय जीवनापासून त्यांची ओळख होणे गरजेचे आहे. आपली आजी, आई रोज काय गुणगुणते हे कान देऊन ऐकायला हवे. कारण त्यात लोकसाहित्याचे माधुर्य दडलेले आहे, असे मत धुळे येथील साहित्यिक प्रा.डॉ.सदाशीव सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.

जय गणेश फाउंडेशनतर्फे तीन दिवसीय द्वारकाई कालिदास नेमाडे फिरती व्याख्यानमाला आयोजित केली आहे. प्रथम पुष्प शुक्रवारी भुसावळ शहरातील दादासाहेब आर. जी. झांबरे माध्यमिक विद्यालयात गुंफण्यात आले. त्यात ते बोलत होते. ‘लोकसाहित्यातून संस्कार आणि काव्यजागर’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता.

सांस्कृतिक विचारांचा वर्षाव
कथा, कविता, गोष्ट, ओव्या, भारुड, लग्नातील दामेंडा आणि त्यांचे महत्व प्रा. सूर्यवंशी यांनी अभ्यासपूर्णपणे मांडले. एकीकडे धो-धो कोसळणारा पाऊस आणि दुसरीकडे सांस्कृतिक विचारांचा वर्षाव असं आगळंवेगळं वातावरण या उपक्रमाच्या निमित्ताने तयार झाले होते. अध्यक्षस्थानी शालेय समितीचे सदस्य शशिकांत झांबरे होते. विचारमंचावर नगरसेवक दीपक धांडे, सातपुडा शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष हेमंत चौधरी, प्रमोद शुक्ला, प्रकाश झांबरे, मुख्याध्यापक नवल महाजन यांची उपस्थिती होती. उपक्रमाचा उद्देश जय गणेश फाउंडेशनचे संस्थापक उमेश नेमाडे यांनी सांगितला. सूत्रसंचालन मनीष गुरचळ यांनी केले. आभार फाउंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र यावलकर यांनी मानले.

लोकगीत, ओव्या काळजाला भिडल्या
वक्ते सदाशिव सूर्यवंशी यांनी सुरुवातीलाच ‘लेकीना कटाया नको करू रे गवारं, लेकीना बिगर तुन्ह उंबरट कुवारं’ या लोकगीतातील ओळी गोड आवाजात सादर करून लक्ष वेधले. मुलींना कमी किंवा परके समजू नका, त्यांना जगू द्या आणि त्यांचा आदर करा असा संदेश या ओळींतून देण्यात ते यशस्वी झाले. पाठ्यक्रमाच्या सोबतच पाठ्यसहयोगी उपक्रम ज्या शाळेत राबवले जातात तेथून समाज घडवण्याची प्रक्रिया सुरू होते असेह त्यांनी नमूद केले.

काळानुरुप म्हणी, वाक्प्रचार बदलावे
काळ बैलगाडीच्या नव्हे तर जेट विमानाच्या वेगाने बदलतो आहे. आपल्या म्हणी आणि वाक्प्रचार तत्कालीन परिस्थितीला अनुरुप होत्या. त्यात आता बदल केला पाहिजे. ‘अपयश यशाची पहिली पायरी आहे’ यात बदल करून ‘यश ही यशाची पहिली पायरी आहे’ असं म्हणणे शिकायला हवे. ‘अंथरुण पाहून पाय पसरावे’ ऐवजी ‘जेवढे पाय पसरवता येतील तेवढे पसरवा म्हणजे अंथरुण तयार होईल’ असे म्हणणे गरजेचे आहे असेही ते म्हणाले.

माय-बापाच्या कवितांनी डोळे पाणावले
व्याख्यानात सूर्यवंशी यांनी प्रशांस असनारेंची ‘आई’ कविता सादर केली. त्यातून त्यांनी घरातील वेगवेगळ्या आणि परस्परविरोधी गरजा सांभाळताना एका स्त्रीचे होणारे मानसिक व शारीरिक पतन, स्वतःचा अंधार करून इतरांना प्रकाश देण्याची तिची अनादी परंपरा या कवितेत तात्विक व प्रभावीपणे दर्शवली असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी देवानंद पवार यांची ‘मह्या मायचं चित्रांग मले भारत दिसते’ ही कविता सादर केली. ग्रामीण आणि मातीशी जोडलेल्या मातृत्वाचे दर्शन घडवणारी ही रचना ऐकताना विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !