भुसावळ विभागात मुलींसह महिलांच्या सुरक्षेसाठी ‘दामिनी पथक’ तैनात
शाळा, महाविद्यालये, बसस्थानके व गर्दीच्या ठिकाणी नियमित गस्त : आठवड्यातून प्रत्येक शैक्षणिक संस्थेला किमान एक भेट बंधनकारक
भुसावळ (शुक्रवार, 31 जुलै 2026) : महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेला अधिक बळकटी देण्यासाठी भुसावळ विभागात विभागस्तरावर ‘दामिनी पथक’ कार्यान्वित करण्यात आले आहे. या पथकाच्या गस्तीचे क्षेत्र, कामकाजाची पद्धत आणि संबंधित पोलीस ठाण्यांच्या जबाबदार्या निश्चित करण्यात आल्या आहेत. महिलांवरील गुन्ह्यांना आळा घालणे, छेडछाडीच्या घटनांवर तातडीने कारवाई करणे आणि शैक्षणिक संस्थांमध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

बाजारपेठ निरीक्षकांकडे जवाबदारी
पोलीस प्रशासनाने जारी केलेल्या आदेशानुसार, दामिनी पथकाच्या संपूर्ण कामकाजाचा समन्वय करण्याची जबाबदारी भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. पथकासाठी दररोज शासकीय वाहन उपलब्ध करून देणे तसेच वाहनाचे लॉगबुक नियमितपणे अद्ययावत ठेवले जात असल्याची खात्री करण्याची जबाबदारीही त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
दर आठवड्यात भेट देणार पथक
या आदेशानुसार सर्व पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकार्यांना त्यांच्या हद्दीतील प्रत्येक शाळा व महाविद्यालयाला आठवड्यातून किमान एकदा दामिनी पथकाची भेट होईल, याची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या भेटी शाळा किंवा महाविद्यालय सुरू होण्याच्या तसेच सुटण्याच्या वेळेतच देण्यावर भर देण्यात आला आहे, जेणेकरून विद्यार्थिनींना प्रत्यक्ष सुरक्षिततेची जाणीव होईल आणि संशयास्पद हालचालींवर त्वरित नियंत्रण ठेवता येईल.
या भागात होणार नियमित गस्त
दामिनी पथकातील महिला अंमलदारांना शाळा, महाविद्यालये, शिकवणी वर्ग, बसस्थानके तसेच गर्दीच्या सार्वजनिक ठिकाणी नियमित गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. गस्तीदरम्यान महिला व मुलींची छेडछाड करणार्या टवाळखोरांवर तात्काळ आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
याशिवाय पथक विद्यार्थिनी व महिलांशी थेट संवाद साधून सुरक्षिततेबाबत जनजागृती करणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी डायल 112 तसेच इतर महिला हेल्पलाइन क्रमांकांची माहिती देऊन महिलांमध्ये कायदेशीर हक्क आणि सुरक्षाविषयक जागरूकता निर्माण केली जाणार आहे.
तक्रारीची घेतली जाणार तत्काळ दखल
गस्तीदरम्यान किंवा भेटीदरम्यान महिला अथवा मुलींकडून कोणतीही तक्रार प्राप्त झाल्यास तिची तात्काळ दखल घेणे, संबंधितांना धीर देणे आणि पुढील आवश्यक कायदेशीर कारवाईसाठी संबंधित पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्यांकडे प्रकरण पाठविण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत.
या आदेशाची तत्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले असून, महिलांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस यंत्रणा अधिक सक्रिय करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे.