नुकसानग्रस्त भागांचे तत्काळ पंचनामे करुन मदत उपलब्ध करुन द्या : पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे निर्देश

अमळनेरामधील अतिवृष्टीग्रस्त भागांची पालकमंत्र्यांसह जलसंपदा मंत्री गिरीश महाजनांकडून पाहणी


जळगाव (सोमवार, 3 ऑगस्ट 2026) : अमळनेर शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागांमध्ये घरे, रस्ते तसेच सार्वजनिक मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी अमळनेर शहरात झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसानग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जिल्हा व स्थानिक प्रशासनाला तातडीने मदतकार्य पूर्ण करण्याच्या तसेच सर्व नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याच्या सूचना दिल्या.

आर्थिक मदतीचे निर्देश
या पाहणी दरम्यान घरांमध्ये पाणी शिरल्याने नुकसान झालेल्या कुटुंबीयांना शासनाकडून नियमानुसार आर्थिक मदत तत्काळ देण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होऊ नये यासाठी पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या मुख्य जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी जिल्हा नियोजन समितीतून तत्काळ निधी उपलब्ध करून देण्यात यावा, असे मंत्री महाजन यांनी सांगितले.

नुकसानीचा घेतला आढावा
पालकमंत्री व जलसंपदा मंत्री यांनी विविध नुकसानग्रस्त वस्त्यांमध्ये जाऊन नागरिकांच्या अडचणी जाणून घेतल्या. विविध प्रकारचे नुकसान झालेल्या कुटुंबियांनी घरे, संसारोपयोगी साहित्य, अन्नधान्य तसेच अन्य मालमत्तेचे झालेल्या नुकसानीबाबत समस्या पालकमंत्री व जलसंपदा मंत्री यांच्यासमोर मांडल्या, त्यावर प्रशासनाने कोणताही विलंब न लावता मदत व पुनर्वसनाची प्रक्रिया राबवावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले.

यावेळी प्रशासनाला शेती, घरे, रस्ते, सार्वजनिक सुविधा व अन्य मालमत्तेच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले. बाधित नागरिकांना आवश्यक ती सर्व मदत वेळेत मिळेल, अशी ग्वाहीही मंत्री श्री.महाजन यांनी दिली.

यांची होती उपस्थिती
या पाहणीवेळी जिल्हाधिकारी रोहन घुगे, आमदार अनिल भाईदास पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, नगराध्यक्ष परीक्षीत बाविस्कर, उपविभागीय अधिकारी मयूर भंगाळे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, नगरपालिका मुख्याधिकारी गणेश शिंदे,अशोक पाटील यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पूरग्रस्त नागरिकांना तातडीची आर्थिक मदत व शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी निधी आणि पंचनाम्यांचे आदेश यामुळे मदतकार्याला अधिक गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रशासनाने युद्धपातळीवर काम सुरू केले आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !