विद्युत तारा चोरी करणारी 11 संशयीतांची टोळी यावल पोलिसांच्या जाळ्यात
यावल तालुका हद्दीतील पाच गुन्ह्यांची : सहा लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त
यावल (गुरुवार, 24 सप्टेंबर 2026) : यावल तालुक्यातील किनगाव व मालोद या गावाच्या शेत-शिवारामध्ये शेतकर्यांकडील विद्युत वितरण कंपनीचे तार चोरी करून त्याची विल्हेवाट लावतांना काही चोरटे मिळून आले. मंगळवारी रात्री चोरटे किनगावच्या एका भंगार व्यावसायीकास तारा देत असतांना शेतकर्यांनी हा प्रकार यावल पोलिसांना कळवल्यानंतर चोरट्यांचे रॅकेट समोर आले. तब्बल 10 आरोपींसह एका अल्पवयीनाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपींच्या ताब्यातून सहा लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तर यावल हद्दीतील पाच गुन्ह्यांची उकलही झाली आहे.
संतप्त शेतकर्यांनी चोरट्यांना पकडले
किनगाव गावापासून मालोद जाणार्या रस्त्यावर शेत शिवारात विद्युत वितरण कंपनीचे तारांचे तुकडे करून त्यांचे गठ्ठे बांधून चोरी करून नेताना ग्रामस्थांना काही संशयीत दिसले व चोरीचे तार एका चारचाकी वाहनातून तार घेण्यासाठी आलेला किनगावातील भंगार व्यावसायीकही दिसताच शेतकर्यांनी संशयीताना पकडून ठेवत यावल पोलिसांना माहिती दिली. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने धाव घेत संशयीतांना ताब्यात घेत विद्युत तारा जप्त केल्या.

10 संशयीतांना अटक
यावल पोलिसांनी एकूण दहा संशयीतांना अटक केली तर अन्य एका अल्पवयीनालाही ताब्यात घेतले. चोरीचे भंगार खरेदी करणार्यालाही आरोपी करण्यात आले. अटकेतील आरोपींमध्ये सुपडू हमजान तडवी (34, रा.मालोद), करीम नशीर तडवी (24, रा. तडवीवाडा, नायगाव), अल्लाउद्दीन मजीद तडवी (27, नायगाव), आसीफ जुम्मा तडवी (25, रा.तडवीवाडा, मालोद), अफसर अकबर तडवी (25, रा.मालोद), खुदाबक्ष रशीद तडवी (25, रा.तडवीवाडा, मालोद), विनोद मेहरबान तडवी (35, रा.मालोद), हैदर बशारत तडवी (41, रा.मालोद) आणि सलीम भिका तडवी (30, रा.मालोद) तसेच चोरीचे भंगार खरेदी करणारा आरीफ युसूफ मणियार (26, किनगाव बु.॥, ता.यावल) याचा समावेश आहे तर एका विधिसंघर्षित बालकासही ताब्यात घेण्यात आले आहे.
सहा लाख 42 हजारांचा मुद्देमाल जप्त
आरोपी आरीफ मणियारने चोरीचा माल जळगावातील ईस्माईल उर्फ लालू मुसा पटेलला विकल्याची कबुली दिल्यानंतर त्यासही ताब्यात घेण्यात आले असून एकूण 175 किलो वजनाची अॅल्युमिनिअम तार जप्त करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून पाच लाखांची कार (एम.एच.43 ए.जे.5864), 20 हजारांची दुचाकी (एम.एच.19 डी.एल.6467), मोटार पंप, तारा केबल व तारांचे तुकडे मिळून सहा लाख 42 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे यांच्या नेतृत्वात सहकार्यांनी ही कामगिरी केली.



