जळगावात प्रवाशाची रक्कम लांबवली : भामट्याला जिल्हापेठ पोलिसांकडून अटक
जळगाव (गुरुवार, 24 सप्टेंबर 2026) : जळगावातील नवीन बसस्थानक परिसरात दिवसाढवळ्या प्रवाशाच्या हाताला झटका मारून रक्कम बळजबरीने हिसकावून पळून गेलेल्या सराईत भामट्याला अटक करण्यात जिल्हापेठ पोलिसांच्या विशेष पथकाला यश आले आहे. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून 16 हजार रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली. आरोपीविरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये 6 गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तपासात समोर आले आहे. भिकन पंडीत शर्मा (60, रा.तलाव गल्ली, पारोळा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे
काय आहे प्रकरण ?
नवीन बसस्थानक परिसरात 17 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी पावणेबारा वाजेच्या सुमारास एक प्रवासी उभा असताना अज्ञात चोरट्याने त्याच्या हातातील 21 हजार रुपयांची रोख रक्कम बळजबरीने हिसकावून पळ काढला होता. या प्रकरणी पीडित प्रवाशाने 19 सप्टेंबर रोजी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. जिल्हापेठ पोलिसांनी भजी गल्लीत सापळा रचून संशयित भिकन पंडीत शर्मा (60, रा. तलाव गल्ली, पारोळा) याला ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्याने जबरी चोरीची कबुली दिली. आरोपीच्या ताब्यातून चोरी गेलेल्या रकमेपैकी 16 हजार रुपये जप्त करण्यात आले.

आरोपी सराईत गुन्हेगार
अटक करण्यात आलेला आरोपी भिकन शर्मा हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरुद्ध चोपडा शहर पोलीस ठाण्यात दोन, पारोळा पोलीस ठाण्यात तीन व जिजल्हापेठ पोलीस ठाण्यात एक असा फसवणूक, तोतयागिरी आणि जबरी चोरीचे एकूण 6 गुन्हे आधीच दाखल आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस निरीक्षक शरद शेवाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल वाघ, पोलीस अंमलदार महेश महाजन, नरेश सोनवणे, तेजस मराठे, दीपक पाटील, प्रवीण जाधव, समाधान पाटील, प्रशांत लाड, कमलाकर बडगुजर आणि अजय अहिरे यांच्या पथकाने केली.



