अतिवृष्टीग्रस्तांना सरसकट पंचनामे करून तातडीने मदत द्या : भडगाव तहसीलदार व तालुका कृषी अधिकार्‍यांना निवेदन

प्रति हेक्टर एक लाख रुपयांच्या मदतीची शेतकरी संघटनेची मागणी


भडगाव (मंगळवार, 4 ऑगस्ट 2026) : भडगाव तालुक्यात 30 व 31 जुलै 2026 रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीपिके, पशूधन तसेच नागरिकांच्या मालमत्तेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटना (भडगाव) यांच्या वतीने तहसीलदार शीतल सोलाट आणि तालुका कृषी अधिकारी दीपक ठाकूर यांना निवेदन देण्यात आले. नुकसानग्रस्त शेतकर्‍यांचे सरसकट पंचनामे करून शासनाने प्रति हेक्टर किमान एक लाख रुपयांची नुकसान भरपाई तातडीने जाहीर करावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.

काय आहे निवेदनातून मागणी
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सलग झालेल्या अतिवृष्टीमुळे कापूस, सोयाबीन, मका, केळी, भाजीपाला तसेच इतर हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक शेतांमध्ये पाणी साचल्याने पिके पूर्णपणे नष्ट झाली असून काही ठिकाणी पशुधनाचाही फटका बसला आहे. याशिवाय अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने धान्य, घरगुती साहित्य आणि इतर मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले आहे.

शेतकरी संघटनेने प्रशासनाकडे पंचनाम्याच्या प्रक्रियेत कोणत्याही शेतकर्‍यावर अन्याय होऊ नये, यासाठी सर्व नुकसानग्रस्तांचे सरसकट पंचनामे करण्याची मागणी केली आहे. तसेच विशेष बाब म्हणून सर्व बाधित शेतकर्‍यांना प्रति हेक्टर किमान एक लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात यावी. पशुधन व घरांच्या नुकसानीसाठीही तातडीने आर्थिक सहाय्य मंजूर करून बाधित कुटुंबांना दिलासा द्यावा, अशीही मागणी करण्यात आली.

तहसीलदार शितल सोलाट यांच्या वतीने नायब तहसीलदार आर. एस. भामरे यांनी निवेदन स्वीकारले. तर कृषी विभागाच्या वतीने तालुका कृषी अधिकारी दीपक ठाकूर, दिगंबर तांबे आणि अनिल तायडे यांनी निवेदन स्वीकारले.

यांची होती उपस्थिती
यावेळी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष अखिलेश पाटील, उपाध्यक्ष वाल्मीक लोखंडे, डॉ. योगेश गोसावी, रामकृष्ण माळी, लीलाधर पाटील, संजय खैरनार, गौतम अहिरे, परशुराम माळी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अतिवृष्टीमुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात
यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष अखिलेश पाटील म्हणाले की, अतिवृष्टीमुळे शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने कोणताही विलंब न करता सरसकट पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाई जाहीर करावी. अन्यथा शेतकरी संघटना लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही त्यांनी दिला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !