घोषणेतच अडकलेले लेवा समाज आर्थिक विकास महामंडळ तातडीने कार्यान्वित करा ; अन्यथा राज्यव्यापी आंदोलन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिशिर डी. जावळे यांचे निवेदन ; निधी, पदभरती व योजनांची त्वरित अंमलबजावणी करण्याची मागणी


भुसावळ (गुरुवार, 6 ऑगस्ट 2026) : महाराष्ट्र शासनाने लेवा समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी लेवा समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली असली, तरी आजतागायत महामंडळाची प्रभावी यंत्रणा उभी राहिलेली नाही. अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक मंडळाच्या नियुक्त्या, आवश्यक निधीची तरतूद आणि प्रत्यक्ष कामकाज सुरू न झाल्याने लेवा समाजात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

राज्यातील इतर समाजांच्या आर्थिक विकास महामंडळांना शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला असून,त्या माध्यमातून स्वयंरोजगार, उद्योजकता विकास, कौशल्य प्रशिक्षण, शैक्षणिक सहाय्य आणि विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या जात आहेत. मात्र, लेवा समाज आर्थिक विकास महामंडळ अद्याप पूर्ण क्षमतेने कार्यान्वित न झाल्याने शासनाच्या भूमिकेबाबत समाजात प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

लेवा हितवादी चळवळीचे युवा नेते शिशिर डी.जावळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या सविस्तर निवेदनात महामंडळ तातडीने कार्यान्वित करण्याची मागणी केली आहे. महामंडळासाठी पुरेसा निधी मंजूर करून अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचारी यांच्या नियुक्त्या त्वरित करण्यात याव्यात, अशी प्रमुख मागणी त्यांनी केली आहे.

निवेदनात जावळे यांनी नमूद केले आहे की, लेवा समाजाने राज्याच्या कृषी, उद्योग, सहकार, शिक्षण आणि सार्वजनिक जीवनाच्या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिले आहे. त्यामुळे इतर समाजांप्रमाणेच लेवा समाजालाही विकासाच्या समान संधी मिळणे हा घटनात्मक आणि न्याय्य अधिकार असून, समाज कोणत्याही विशेष सवलतीची नव्हे तर समान न्याय आणि समान विकासाच्या संधीची अपेक्षा करीत आहे.

लेवा समाजातील युवक, महिला, शेतकरी, विद्यार्थी, उद्योजक आणि व्यावसायिक यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी महामंडळामार्फत अल्पव्याज कर्ज योजना, स्वयंरोजगार, कौशल्य विकास, उद्योग प्रोत्साहन आणि शैक्षणिक सहाय्याच्या योजना तातडीने सुरू करण्याची गरज असल्याचेही त्यांनी अधोरेखित केले आहे.

दरम्यान, शासनाने या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहून तातडीने निर्णय घेतला नाही आणि लेवा समाज आर्थिक विकास महामंडळाबाबतची उदासीन भूमिका कायम राहिली, तर राज्यभर लेवा समाजाच्या सहभागातून लोकशाही मार्गाने व्यापक आणि तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठविलेल्या पत्रातून देण्यात आल्याची माहिती लेवा हितवादी चळवळीचे युवा नेते शिशिर डी. जावळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !